बहुगुणी डेस्क, वणी: वडिलोपार्जित शेतीच्या हिस्स्याच्या वादातून एका कुटुंबात हिंसक संघर्ष उफाळून आला. हिस्स्याच्या मागणीवरून झालेल्या वादाचे पर्यवसान लाकडी दांड्याने मारहाणीपर्यंत झाले. या हल्ल्यात एका व्यक्तीचा हात फ्रॅक्चर झाला असून पत्नीला देखील मारहाण व जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची तक्रार आहे. रविवारी 12 जुलै रोजी संध्याकाळी तालुक्यातील मंदर येथे ही घटना घडली. या प्रकरणी वणी पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारीनुसार, फिर्यादी लता वसंत बुच्चे (53, रा. मंदर, ता. वणी) या शेती व्यवसाय करतात. त्यांचा मंदर शिवारात असलेल्या वडिलोपार्जित 15 एकर शेतीच्या हिस्स्यावरून त्यांची नणंद संगीता सुभाष चिवाने (45, रा. लालगुडा, ता. वणी) हिच्याशी मागील काही दिवसांपासून वाद सुरू आहे.
रविवारी (दि. 12 जुलै) सायंकाळी सुमारे 6 वाजताच्या सुमारास संगीता चिवाने, तिचा मुलगा गौरव सुभाष चिवाने (20) आणि चेतन राजू पंडीले (28, रा. वागदरा) हे फिर्यादी लताच्या घरासमोर आले. यावेळी शेतीच्या हिस्स्यावरून दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद झाला. फिर्यादीच्या पतीने इतर भावांकडून हिस्सा घेण्याचा सल्ला दिल्यानंतर वाद अधिकच चिघळला.
वाद वाढताच गौरव चिवाने याने हातातील लाकडी दांड्याने फिर्यादीच्या पतीवर हल्ला केला. या मारहाणीत त्यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाले, तसेच डोक्यालाही मार लागला. पतीला वाचविण्यासाठी मध्ये पडलेल्या फिर्यादीला चेतन पंडीले याने शिवीगाळ केली, तर संगीता चिवाने हिने थपडा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकीही देण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर फिर्यादीने वणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी पोलिसांनी संगीता सुभाष चिवाने, गौरव सुभाष चिवाने आणि चेतन राजू पंडीले यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 115(2), 117(3), 351(2), 351(3), 352 आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत. (इमेज एआय जनरेटेड)


Comments are closed.