तुझ्या-माझ्या बायकोचे नाव सेमच…. त्यामुळे तुझी बायको माझी !

दारूच्या नशेत अंडरपँटवर रस्त्यावर येत अश्लील शेरेबाजी

बहुगुणी डेस्क, वणी: रात्रीची वेळ… दारूच्या नशेत हातात दंडा घेऊन अंडरपँटवर एक व्यक्ती शेजारच्या घरासमोर येते आणि “तुझी बायको माझीच बायको आहे,” म्हणत अश्लील शेरेबाजी करते. दांपत्याला शिवीगाळ व जीवे मारण्याच्या धमक्या देते. दोन दिवसांनी पुन्हा त्याच प्रकाराची पुनरावृत्ती होते. अखेर संतप्त महिलेने चुलत दिराविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. झरी तालुक्यातील शिबला येथे ही घटना घडली. 

तक्रारीनुसार, फिर्यादी (57) या शिबला येथील रहिवासी असून त्या घरकाम करतात. त्यांचा चुलत दीर (45) हा त्यांच्या घराशेजारी राहतो. जुन्या संडासाच्या कारणावरून दोन्ही कुटुंबांमध्ये मागील काही दिवसांपासून वाद सुरू आहे. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

दारूच्या नशेत धिंगाणा
8 जुलै रोजी रात्री सुमारे 9.30 वाजता आरोपी दारूच्या नशेत हातात अंडरपँटवर दंडा घेऊन घरासमोरील सार्वजनिक रस्त्यावर आला. यावेळी त्याने फिर्यादीच्या घरासमोर जाऊन धिंगाणा घालण्यास सुरुवात केली. माझ्या पत्नीचे आणि तुझ्या पत्नीचे नाव एकच आहे. त्यामुळे तुझी बायको पण माझी बायकोच आहे. असे म्हणत अश्लील शेरेबाजी केली. तसेच बकरा कापल्यासारखे तुम्हाला कापून टाकीन, अशी धमकी देखील दिली. त्यानंतर तो तेथून निघून गेला.

यानंतर दोन दिवसांनी म्हणजे 10 जुलै रोजी दुपारी सुमारे 11.30 वाजता आरोपी पुन्हा दारूच्या नशेत घरासमोर आला. घरासमोरील बंडीवर पाण्याचा ड्रम ठेवण्याच्या कारणावरून त्याने दांपत्याशी वाद घालत पुन्हा अश्लील शिवीगाळ केली. तसेच, “तुम्हा दोघांना एखाद्या दिवशी चाकूने कापून टाकीन, माझे कोणी काहीही करू शकत नाही,” अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. 

सततची जीवे मारण्याची धमकी तसेच अश्लील शेरेबाजी याला कंटाळून अखेर महिलेने तिच्या चुलत दिराविरोधात तक्रार दिली. या प्रकरणी पाटण पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 352, 351(2) आणि 296 अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Comments are closed.