चिखलगावचा सुपुत्र भार्गव हिरसकरची IIT पर्यंत भरारी

बेताची परिस्थिती... मात्र प्रतिकूल परिस्थितीलाही जिद्दीने दिले उत्तर

बहुगुणी डेस्क, वणी: आर्थिक अडचणी, घरची बेताची परिस्थिती, मार्गदर्शनाचा अभाव… या सर्व अडथळ्यांवर जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांच्या जोरावर मात करत चिखलगावचा सुपुत्र भार्गव हिरसकर याने देशातील प्रतिष्ठित IIT (Indian Institute of Technology) धनबाद येथे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग शाखेत प्रवेश मिळवला आहे. स्वयंपाक व मजुरीचे काम करून संसार चालवणाऱ्या आईच्या कष्टांचे हे स्वप्नवत यश आज संपूर्ण परिसरासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

भार्गवचे प्राथमिक शिक्षण वणी पब्लिक स्कूल, वणी येथे झाले. लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असलेल्या भार्गवने त्यानंतर जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली. त्यामुळे त्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण नागपूर येथील नवोदय विद्यालयात पूर्ण झाले. लहानपणापासूनच IITमध्ये प्रवेश घेण्याचे स्वप्न त्याने उराशी बाळगले होते. मात्र, कोणतेही कोचिंग क्लास किंवा विशेष मार्गदर्शन उपलब्ध नसल्याने पहिल्याच प्रयत्नात त्याचे हे स्वप्न अपूर्ण राहिले. अनेकजण या टप्प्यावर खचून गेले असते; पण भार्गवने हार मानली नाही.

दरम्यान, त्याच्या जिद्दीची आणि संघर्षाची माहिती दक्षणा फाउंडेशन, पुणेपर्यंत पोहोचली. संस्थेने त्याला एका वर्षासाठी मोफत निवासी IIT प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. या संधीचे सोने करत भार्गवने दिवस-रात्र एक करून अभ्यास केला आणि अखेर IIT प्रवेश परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली. त्याला IIT धनबाद येथे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग शाखेत प्रवेश मिळाला. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

यश मिळाले, पण प्रवेशासाठी लागणाऱ्या शुल्काचा प्रश्न अजूनही उभाच होता. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने हा मोठा अडथळा होता. मात्र, मुलाच्या शिक्षणासाठी खर्च होणार हे लक्षात घेऊन आईने बचत केली. ही बचत प्रवेशाच्या वेळी उपयोगी पडली. तरीही काही रक्कम कमी पडत होती. वणीतील स्माईल फाउंडेशनला ही बाब कळली. त्यांनी ही बाब वणीतील उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते किरण दिकुंडवार यांच्या निदर्शनास आणून दिली. परिसरातील एका होतकरू विद्यार्थ्याचे स्वप्न आर्थिक कारणामुळे अपूर्ण राहू नये, या भावनेतून त्यांनीही प्रवेशासाठी आवश्यक आर्थिक मदतीचा हात पुढे केला. त्यामुळे भार्गवच्या IITमध्ये प्रवेशाचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला.

भार्गवचे अंतिम ध्येय केवळ अभियंता होणे नाही. भविष्यात प्रशासकीय सेवेत (Civil Services) प्रवेश करून समाजासाठी काम करण्याची त्याची इच्छा आहे. त्याच्या यशामागे आईचा त्याग, दक्षणा फाउंडेशनचे मार्गदर्शन आणि मित्रपरिवाराचे सहकार्य महत्त्वाचे असल्याची माहिती त्याने ‘वणी बहुगुणी’ला दिली. 

चिखलगावातून सुरू झालेला हा संघर्षमय प्रवास आता IIT धनबादपर्यंत पोहोचला आहे. प्रतिकूल परिस्थिती ही यशाच्या आड येत नाही, तर जिद्द, मेहनत आणि योग्य संधी मिळाल्यास अशक्य वाटणारी स्वप्नेही साकार होतात, हे भार्गव हिवरकरने आपल्या यशातून सिद्ध करून दाखवले आहे. आज त्याच्या या यशाचे संपूर्ण वणी तालुक्यात आणि परिसरात कौतुक होत असून, हजारो विद्यार्थ्यांसाठी तो प्रेरणेचा दीप बनला आहे. (भार्गव हिरसकर – 7028691710)

Comments are closed.