जेन अल्फा उतरला रस्त्यावर; ‘आम्हाला शिक्षक द्या !’

परमडोहच्या विद्यार्थ्यांनी फुंकले रणशिंग, आंदोलनाला यश

तालुका प्रतिनिधी, वणी: सध्या जेन झीचे आंदोलन देशभरात चर्चेचा विषय झाला आहे. यात जेन अल्फा देखील मागे राहिले नाहीत. ही पिढी वर्गात बसून शिकणारे राहिलेले नाहीत; आपल्या हक्कांसाठी आणि शिक्षणाच्या प्रश्नांसाठी आवाज उठविण्याची त्यांची तयारी दिसून येत आहे. याच बदलत्या विद्यार्थीवृत्तीचा प्रत्यय वणी तालुक्यातील परमडोह येथेही आला. प्रतिनियुक्तीवर गेलेले शिक्षक तातडीने परत पाठविण्याची मागणी करूनही प्रशासनाकडून तब्बल 12 दिवस ठोस कार्यवाही झाली नाही. अखेर संतप्त पालक, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आणि विद्यार्थ्यांनी सोमवारी (दि. 10 ऑगस्ट) यवतमाळ येथील प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालय गाठून ठिय्या आंदोलन केले.

परमडोह येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता 1 ली ते 7 वीपर्यंत वर्ग असून, पटसंख्येच्या आधारे चार शिक्षकांची पदे मंजूर आहेत. मात्र, सध्या केवळ तीन शिक्षक कार्यरत आहेत. त्यापैकी एक शिक्षक पाथरी येथील शाळेत प्रतिनियुक्तीवर असून, दुसऱ्या शिक्षकाची निंबाळा येथे एसआयआरच्या कामासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. परिणामी, प्रत्यक्षात शाळेतील शैक्षणिक आणि प्रशासकीय कामकाजाचा मोठा भार एका शिक्षकावर आला आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी प्रतिनियुक्तीवर असलेल्या शिक्षकांना परमडोह शाळेत तातडीने परत पाठवावे, अशी मागणी पालकांनी 27 जुलै रोजी गटशिक्षणाधिकारी, वणी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. मात्र, मागणी करूनही अपेक्षित कार्यवाही न झाल्याने पालकांमध्ये नाराजी वाढली. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

 

“प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाचा आदेश प्राप्त झाला आहे. त्या आदेशानुसार प्रतिनियुक्तीवर असलेल्या शिक्षकांना त्वरित परत पाठविण्याची कार्यवाही केली आहे.”
— स्नेहदीप काटकर, गटशिक्षणाधिकारी, वणी

पालकांच्या मागणीची दखल घेत प्राथमिक शिक्षणाधिकारी मिश्रा यांनी तत्काळ गटशिक्षणाधिकारी, वणी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. तसेच परमडोह शाळेत प्रतिनियुक्तीवर असलेल्या शिक्षकांना तातडीने परत पाठविण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर संबंधित शिक्षकांना परत पाठविण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली. त्यामुळे पालकांच्या आंदोलनाला यश मिळाल्याचे मानले जात आहे.

Comments are closed.