माळी महासंघाची नवी कार्यकारिणी, वणीच्या दोघांना महत्त्वाची जबाबदारी

अक्षय निकोडे युवा अध्यक्षपदी, तर भास्कर वाढई जिल्हा सचिवपदी

बहुगुणी डेस्क, वणी: अखिल भारतीय माळी महासंघाच्या यवतमाळ जिल्हा कार्यकारिणीची घोषणा नुकतीच करण्यात आली. यवतमाळ येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या सहविचार सभेत महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुभाष सातव यांच्या उपस्थितीत विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यात वणी येथील अक्षय बाळकृष्ण निकोडे यांची वणी शहर युवा अध्यक्षपदी, तर भास्कर वाढई यांची जिल्हा सचिव (पूर्व) पदी निवड करण्यात आली.

माळी समाजाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने आयोजित या सहविचार सभेत ‘समता, एकता व विकास’ या विचारांना केंद्रस्थानी ठेवून समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. सामाजिक, शैक्षणिक आणि संघटनात्मक कार्याला अधिक बळ देण्यासाठी जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये संघटनेची व्याप्ती वाढविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

यवतमाळ जिल्हा कार्यकारिणीत विविध पदांवर 14 पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. यात विदर्भ संघटिका महिला आघाडीपदी माधुरी केवटे, जिल्हाध्यक्ष पश्चिमपदी राजेंद्र घाटे, जिल्हाध्यक्ष पूर्वपदी संजय गुरनुले, जिल्हा कार्याध्यक्ष पूर्वपदी मधुसूदन मोहुर्ले, जिल्हा युवा कार्याध्यक्ष पूर्वपदी करण चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष पूर्वपदी बाबाराव शेंडे, जिल्हा उपाध्यक्ष पश्चिमपदी प्रमोद राऊत, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पूर्वपदी रेखा मोहुर्ले, महिला आघाडी जिल्हा संघटिकापदी शुभांगी शेंडे यांच्यासह विविध तालुक्यांच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

अक्षय निकोडे यांची वणी शहर युवा अध्यक्षपदी निवड झाल्याने वणीतील युवकांच्या संघटनात्मक सहभागाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. तसेच भास्कर वाढई यांच्याकडे जिल्हा सचिव (पूर्व)पदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याने पूर्व विभागातील संघटनात्मक कामकाजाला अधिक गती मिळण्याची अपेक्षा आहे.

“माळी महासंघाने माझ्यावर सोपविलेली वणी शहर युवा अध्यक्षपदाची जबाबदारी ही माझ्यासाठी सन्मानासोबतच मोठी जबाबदारी आहे. समाजातील युवकांना संघटित करून त्यांना सामाजिक, शैक्षणिक आणि संघटनात्मक कार्याशी जोडण्याला प्राधान्य देणार आहे. ‘समता, एकता व विकास’ या विचारांच्या माध्यमातून समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा माझा प्रयत्न राहील.”
— अक्षय बाळकृष्ण निकोडे, वणी शहर युवा अध्यक्ष, अखिल भारतीय माळी महासंघ

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या सहविचार सभेला यवतमाळ, दारव्हा, नेर, आर्णी, पांढरकवडा, राळेगाव, कळंब, बाभुळगाव, मारेगाव, वणी आणि झरी तालुक्यांतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments are closed.