वणीत 3 दुकानावर धाड; 70 किलो माल जप्त

थर्माकोल व सिंगल यूज प्लास्टिकवर नगरपरिषदेचा दणका

पुरुषोत्तम नवघरे, वणी: सिंगल यूज प्लास्टिक व थर्माकोलपासून तयार होणाऱ्या प्रतिबंधित वस्तूंच्या वापर, विक्री व साठवणुकीविरोधात वणी नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाने धडक कारवाई केली. 20 ऑगस्ट रोजी शहरातील गांधी चौक व विराणी टॉकीज परिसरातील 3 आस्थापनांवर तपासणी करून सुमारे 70 किलो प्रतिबंधित प्लास्टिक व थर्माकोल साहित्य जप्त करण्यात आले. संबंधित तिन्ही आस्थापनांवर प्रत्येकी 5 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. नगरपरिषदेने अचानक केलेल्या या कारवाईमुळे सिंगल यूज प्लास्टिकचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

नुकतेच शासनाने एकल वापर (सिंगल यूज) प्लास्टिक बंदी मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार गुरुवारी वणी नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाच्या पथकाने शहरातील गांधी चौक आणि विराणी टॉकीज परिसरातील विविध आस्थापनांची तपासणी करत धडक कारवाई केली. या कारवाईदरम्यान दुकानांमधून थर्माकोलच्या प्लेट्स, प्लास्टिकचे चमचे, पाण्याचे ग्लास, पन्नी तसेच इतर प्रतिबंधित प्लास्टिक साहित्य आढळून आले. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

दर महिन्याला पडणार धाड?
सिंगल यूज प्लास्टिक बंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी दर महिन्याला विशेष तपासणी मोहीम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार ऑगस्ट 2026 मध्ये शहरातील विविध भागांत तपासणी करून प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर, साठवणूक व विक्री करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश आहेत. तपासणीदरम्यान अनुचित घटना टाळण्यासाठी संबंधित पथकाला आवश्यक प्रशासकीय मदत तसेच पोलीस संरक्षण उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे दर महिन्याला धाड पडणार की एका कार्यवाही नंतर शांत होणार याकडे वणीकरांचे लक्ष लागले आहे.  

सदर कार्यवाही मुख्याधिकारी, नगरपरिषद वणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक विक्की करसे यांच्या नेतृत्वाखाली मुकादम सुरज तांबे, अविनाश माटे, मनीष तोमस्कर, धीरज नरपांडे आणि राजेश चवरे यांनी कारवाईत सहभाग घेतला. नागरिक आणि व्यावसायिकांनी सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर करावा तसेच प्लास्टिक बंदीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाने केले आहे. प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर, विक्री किंवा साठवणूक आढळून आल्यास यापुढेही नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Comments are closed.