ग्रामसभा अर्धवट सोडून सरपंच-उपसरपंच निघून गेले !

नागरिकांच्या प्रश्नांवरून ग्रामसभेत गोंधळ; असभ्य वर्तनाचा आरोप

 विवेक तोटेवार, वणी: वणी तालुक्यातील चिखलगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत नागरिकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा सुरू असताना सरपंच व उपसरपंच यांनी नागरिकांशी असभ्य व अरेरावीच्या भाषेत वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर ग्रामसभा अर्धवट सोडून सरपंच व उपसरपंच निघून गेल्याने ग्रामसभेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सोमवार, 24 ऑगस्ट रोजी सकाळी चिखलगाव येथे ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. ग्रामसभेला गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामसभा सुरू झाल्यानंतर ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांसह नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा सुरू झाली.

यावेळी सरपंच व उपसरपंच यांनी उपस्थित नागरिकांशी अरेरावी व असभ्य भाषेत वर्तन केल्याचा आरोप ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीत केला आहे. या प्रकारामुळे ग्रामसभेतील वातावरण बिघडल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर सरपंच व उपसरपंच यांनी ग्रामसभा अर्धवट सोडून निघून गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामसभेचे कामकाज अपूर्ण राहिल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या प्रकरणी ग्रामस्थांच्या वतीने पंचायत समिती, वणी येथील गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज साद करण्यात आला आहे. ग्रामसभेतील उपस्थिती नोंद तसेच उपलब्ध ध्वनिचित्रफितींची तपासणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सरपंच व उपसरपंच यांनी नागरिकांशी असभ्य व अरेरावीच्या भाषेत वर्तन केले असल्यास नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे. तसेच ग्रामसभा अर्धवट सोडून जाण्याच्या प्रकाराची चौकशी करून भविष्यात ग्रामसभा नियमानुसार आणि शांततेत पार पडण्यासाठी आवश्यक सूचना द्याव्यात, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.

ग्रामसभा हे गावातील नागरिकांच्या समस्या, विकासकामे आणि विविध प्रश्नांवर चर्चा करण्याचे महत्त्वाचे लोकशाही व्यासपीठ आहे. त्यामुळे या प्रकरणाची प्रशासनाकडून चौकशी होऊन दोषींवर नियमानुसार कारवाई होते का, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.