पंचशील चौक–ब्राह्मणी फाटा रस्ता खड्ड्यांनी पोखरला
खड्डेमय रस्त्याविरोधात शिवसेना आक्रमक; 15 दिवसांचा अल्टिमेटम
विवेक तोटेवार, वणी: शहरातील पंचशील चौक ते ब्राह्मणी फाटा या प्रमुख वर्दळीच्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, रस्त्याची तातडीने दुरुस्ती व नूतनीकरण करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना उबाठातर्फे करण्यात आली आहे. याबाबत वणी शहरप्रमुख विनोद मनोहरराव ढुमणे यांनी नगरपरिषद प्रशासनाकडे केली आहे. तसेच रस्ता दुरुस्तीसाठी 15 दिवसांचा अल्टिमेटम देखील देण्यात आला आहे.
पंचशील चौक ते ब्राह्मणी फाटा हा शहरातील महत्त्वाचा मुख्य मार्ग आहे. मात्र, या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक, पादचारी, विद्यार्थी, रुग्ण तसेच नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या मार्गावर रुग्णालये, शाळा तसेच WCL कडे जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांची खोली लक्षात येत नाही. त्यामुळे वाहनचालकांना अंदाज न आल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या या मार्गाची तातडीने दुरुस्ती न झाल्यास परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या समस्येकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. पंचशील चौक ते ब्राह्मणी फाटा या संपूर्ण रस्त्याची पाहणी करून खड्डे बुजविणे, आवश्यक त्या ठिकाणी रस्त्याची दुरुस्ती करणे तसेच रस्त्याचे दर्जेदार नूतनीकरणाचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
15 दिवसांचा अल्टिमेटम
निवेदनाद्वारे नगरपरिषद प्रशासनाला 15 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. या कालावधीत रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू न झाल्यास नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन लोकशाही मार्गाने रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. आंदोलनादरम्यान निर्माण होणारी वाहतूक कोंडी अथवा इतर परिस्थितीसाठी नगरपरिषद प्रशासनाची उदासीनता आणि काम सुरू करण्यास झालेला विलंब जबाबदार राहील, याची नोंद प्रशासनाने घ्यावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी नगरसेवक सुधीर थेरे, गुलाम रसूल रंगरेज, शत्रुघ्न मालेकर, अनिकेत बदखल, अजय ढोबे, मोरेश्वर उज्वलकर, राजीव पाटील, किशोर गोहोकार, मनीष बत्रा, अजय चन्ने तसेच युवा सेना शहरप्रमुख तुलसी तेतर, नितीन रामगिरवार, शंकर देरकर, कसाबीर भाई, पांडुरंग पोतराजे, गजानन बरडे, पंकज आवारी, राहुल धानोरकर आणि वैभव गायकवाड उपस्थित होते.


Comments are closed.