रस्त्याची तीन महिन्यांतच दुरवस्था; नागरिक आक्रमक
चौकशी व दुरुस्तीची मागणी, 31 ऑगस्टला रास्ता रोकोचा इशारा
पुरुषोत्तम नवघरे, वणी: शिंदोला–येनक–साखरा–जुगाद एम.टी.डी.आर.-79 या रस्त्याच्या निकृष्ट कामाविरोधात नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराचा निषेध केला. रस्त्याचे काम पूर्ण होऊन अवघे तीन महिने झाले असतानाच आदर्श हायस्कूल ते शेवाळा फाटा तसेच कोलगावजवळील रस्त्याची पुन्हा दुरवस्था झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दर्जेदार रस्ता करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. आयुष रोहिदास ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभाग, पांढरकवडा येथील कार्यकारी अभियंत्यांना उपविभागीय अभियंता, बांधकाम विभाग, वणी यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले.
शिंदोला–येनक–साखरा या रस्त्याचे काम बाजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनी प्रायव्हेट लिमिटेड, यवतमाळ यांना देण्यात आले आहे. मात्र, संबंधित काम निर्धारित कालावधी तसेच करारातील अटी व शर्तींनुसार करण्यात आले नसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. या रस्त्याच्या कामासंदर्भात यापूर्वीही 14 ऑक्टोबर 2024 रोजी निवेदन देण्यात आले होते. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघातांचा धोका वाढला असून, रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांना धुळीचा त्रास तसेच नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते.
मात्र, रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांतच ठिकठिकाणी रस्ता खराब झाल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने शेड्युल डिझाईन, रस्त्याचे डिझाईन, पुलिया डिझाईन तसेच करारनाम्यातील अटी व शर्तींनुसार काम केले आहे किंवा नाही, याची तांत्रिक तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
निकृष्ट बांधकाम झालेले भाग काढून गुणवत्तापूर्ण व पूर्ववत दर्जाचा रस्ता करून द्यावा, संबंधित कामाची स्वतंत्र चौकशी करावी तसेच दोषी अधिकारी आणि संबंधित ठेकेदाराची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदन देण्यासाठी नागरिक व कार्यकर्ते कार्यालयात गेले असता उपविभागीय अभियंता उपस्थित नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संतप्त नागरिक व कार्यकर्त्यांनी बांधकाम प्रशासनाच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. घोषणाबाजी सुरू झाल्यानंतर उपविभागीय अभियंता कार्यालयात दाखल झाले. त्यांच्याकडे निवेदन सुपूर्द करण्यात आले. प्रशासनाने तातडीने रस्त्याची पाहणी करून निकृष्ट कामाची दुरुस्ती केली नाही, तर 31 ऑगस्ट 2026 रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. आंदोलनाची वेळ येऊ नये यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.
यावेळी आयुष रोहिदास ठाकरे, अजिंक्य शेंडे, भगवान मोहिते, प्रणय बदखल, रवी वाटेकर, कार्तिक आत्राम, लता ठावरी, दादु गोरे, अनिकेत बलकी, पियुष हजारे, प्रवीण डोहे, सुदर्शन शिंदे यांच्यासह नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.


Comments are closed.