बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील स्वामीसमर्थनगर परिसरात घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी घरातील चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पियुष रमेशचंद चोरडिया (वय 28) यांनी दिलेल्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध बीएनएसच्या कलम 305(a), 331(3) आणि 331(4) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारीनुसार, पियुष चोरडिया हे स्वामीसमर्थनगर येथे भाड्याने राहतात. त्यांच्या आजी प्रेमाबाई सुरेश चोरडिया (वय 80) या चातुर्मासानिमित्त 9 ऑगस्टपासून नागपूर येथे गेल्या आहेत. त्यामुळे पियुष, त्यांचे आई-वडील असे तिघेच घरी राहत होते. दरम्यान, 21 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास पियुष हे आई-वडिलांसह काही कामानिमित्त नागपूर येथे गेले. घराला कुलूप लावून ते निघून गेले होते.
25 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6.45 वाजताच्या सुमारास पियुष यांचे वडील रमेशचंद चोरडिया घरी परतले. त्यावेळी घराचे कंपाउंड गेट बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. गेट उघडून आत गेल्यानंतर घराच्या मुख्य दरवाज्याचे कुलूप स्क्रूड्रायव्हरच्या साहाय्याने काढल्याचे आणि दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले. घरात प्रवेश केल्यानंतर सामान अस्ताव्यस्त पडलेले आढळले. याबाबत त्यांनी कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानंतर पियुष व त्यांची आई रात्री 10 वाजताच्या सुमारास वणी येथे पोहोचले.
घराची पाहणी केली असता बेडरूममधील सामान अस्ताव्यस्त होते. तसेच आलमारीचे लॉकर तोडण्यात आले होते. त्यातील जुने पैंजण, बिछिया, चांदीच्या 5 अंगठ्या आदी अंदाजे 250 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने चोरीस गेल्याचे आढळून आले. या दागिन्यांची अंदाजे जुनी किंमत 15,000 रुपये असल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच आजीच्या खोलीतील सामानही अस्ताव्यस्त पडलेले होते. लोखंडी कपाट तुटलेल्या अवस्थेत आढळले. आजी चातुर्मासाहून परतल्यानंतर त्यातील नेमके कोणते दागिने चोरीस गेले आहेत, याची माहिती मिळणार असल्याचे तक्रारदाराने पोलिसांना सांगितले.
21 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजेपासून 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6.45 वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप उचकटून चोरी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पियुष रमेशचंद चोरडिया (वय 28) यांनी दिलेल्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध बीएनएसच्या कलम 305(a), 331(3) आणि 331(4) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.


Comments are closed.