बहुगुणी डेस्क, वणी: लग्नानंतर संसाराची स्वप्ने रंगवत सासरी गेलेल्या एका 32 वर्षीय विवाहितेचा संसार पैशांच्या मागणीमुळे उद्ध्वस्त झाल्याची घटना समोर आली आहे. गॅरेज टाकण्यासाठी माहेरून पैसे आणण्याचा तगादा, पैशांची मागणी पूर्ण न झाल्यानंतर मारहाण, चारित्र्यावर संशय आणि मानसिक छळ केल्याचा आरोप विवाहितेने केला आहे. माहेरच्यांनी यापूर्वी 85,000 रुपये दिल्यानंतरही आणखी 45,000 रुपयांसाठी दबाव टाकण्यात आल्याचा आरोप असून, या प्रकरणात पतीसह सासरच्या 7 जणांविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, पीडिता (32) ही वणीतील मुळची वणीतील रहिवासी आहे. 2024 मध्ये तिचा वर्धा जिल्ह्यातील एका तरुणासोबत रितीरिवाजाप्रमाणे झाला. त्यांना एक 9 महिन्यांची मुलगी आहे. विवाहानंतर सुरुवातीचे काही दिवस सासरकडील लोकांनी चांगली वागणूक दिली. मात्र, त्यानंतर काही महिन्यांतच पैशांच्या मागणीवरून छळ सुरू झाल्याचा आरोप पत्नीने केला. पतीने गॅरेज टाकण्यासाठी माहेरून पैसे आणण्याची मागणी केली होती.
गॅरेज टाकण्यासाठी पैशाची मागणी!
पत्नीने त्यांचा भाऊ आणि आई मजुरी करून उदरनिर्वाह करीत असल्याने एवढे पैसे आणणे शक्य नसल्याचे सांगितले. यावरून वाद घालून मारहाण करण्यात आली. अखेर संसार तुटू नये व सुरळीत चालावा म्हणून पत्नी यांच्या माहेरच्यांनी पतीला 85,000 रुपये दिले. मात्र, काही दिवसांनंतर पुन्हा पैशांची मागणी सुरू झाली. यावेळी 45,000 रुपये माहेरून आणण्याची मागणी करण्यात आल्याचा आरोप पत्नीचा आहे.
बदचलन म्हणत चारित्र्यावर संशय
पैसे आणण्यास नकार दिल्यानंतर सासरच्या मंडळींनी पत्नी ही नेहमी आजारी असते, आजारी मुलीला आमच्या नशिबी टाकले, असे टोचून बोलण्यात आले. तसेच पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन वारंवार वाद व मारहाण करण्यात आली. पती, भासरा, जाऊ, सासरे, सासू, ननंद आणि नंदोई हे पीडितेवर घरातील काम व्यवस्थित करत नाही, बदचलन आहे, असे आरोप करून पतीला पत्नीविरुद्ध भडकवले असेही तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, 29/06/2026 रोजी सकाळी सुमारे 11 वाजता खराब कपडे धुण्याच्या कारणावरून वाद झाला. बाळाला सांभाळावे लागत असल्याने कपडे धुणार नसल्याचे सांगितल्यानंतर सासू, भासरा आणि ननंद यांनी शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर त्यांनी पतीला भडकवले. त्यामुळे पतीनेही मारहाण करून घरातून निघून जाण्यास सांगितले. पत्नीला अंगावरील दागिने काढून घराबाहेर काढण्यात आले. यानंतर पत्नीने भावाला बोलावून घेतले आणि त्या मुलीसह माहेरी, वणीत आल्या.
त्यानंतर पती किंवा सासरचे लोक आपल्याला परत सासरी घेण्यासाठी येतील, अशी अपेक्षा होती. मात्र, कोणीही आले नसल्याने त्यांनी पतीशी फोनवर संपर्क साधला. पतीने आपल्याला घेण्यासाठी येणार नसल्याचे सांगितले. अखेर पत्नीने वणी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली होती. त्यानंतर हे प्रकरण महिला समुपदेशन केंद्र, पांढरकवडा येथे चालले. मात्र, तेथे समझोता न झाल्याने पत्नीच्या रिपोर्टवरून पतीसह सासरच्या एकूण 7 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 85 आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.


Comments are closed.