‘स्मशानभूमीसाठी रस्ता मागतोस?’; वृद्धाला काठीने मारहाण

चौघांविरोधात ऍट्रोसिटी... उपोषणाला बसलास तर जीवे मारण्याची धमकी!

बहुगुणी डेस्क, वणी : ‘माझ्या शेतातून स्मशानभूमीसाठी रस्ता का मागतोस?’ असे म्हणत 70 वर्षीय वृद्धाला रस्त्यात अडवून काठीने बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार मारेगाव तालुक्यातील चिंचाळा येथे घडला. ग्रामपंचायत चौकशी आटोपून घरी परतणाऱ्या वृद्धाला चौघांनी घेरल्याचा आरोप असून, दोघांनी पकडून ठेवले तर अन्य दोघांनी काठीने मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. एवढ्यावरच न थांबता ‘उपोषणाला बसलास तर तुला मारून टाकीन’ अशी जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे. या प्रकरणी ऍट्रोसिटिसह विविध कलमान्वये चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, फिर्यादी दिगंबर गणपत आत्राम (वय 70, व्यवसाय शेतमजुरी, रा. चिंचाळा) येथील रहिवासी आहे. ते  23 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास घरी होते.  दरम्यान ग्रामपंचायतीचा चपराशी आत्राम यांच्या घरी आला. ग्रामपंचायतीत विस्तार अधिकारी चौकशीसाठी आले असून, त्यांनी बोलावल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर आत्राम ग्रामपंचायत कार्यालयात गेले.

तेथे ग्रामपंचायत सचिव आणि विस्तार अधिकारी उपस्थित होते. आत्राम यांनी यापूर्वी दिलेल्या तक्रारीच्या चौकशीसाठी आपण आलो असल्याचे विस्तार अधिकाऱ्यांनी सांगितले. चौकशी झाल्यानंतर विस्तार अधिकारी मारेगावकडे रवाना झाले. त्यानंतर आत्राम हे ग्रामपंचायत सचिवांसोबत महादेव इंगोले यांच्या घराजवळच्या गल्लीपर्यंत गेले. सचिवांसोबत चर्चा झाल्यानंतर त्या तेथून निघून गेल्या आणि आत्राम घरी जाण्यासाठी निघाले. मात्र, त्याचवेळी सागर इंगोले, मधु इंगोले, महादेव इंगोले आणि मुरलीधर भट्ट यांनी त्यांना अडवले. 

त्यांनी आत्राम यांना शिवीगाळ करत ‘माझ्या शेतातून स्मशानभूमीसाठी रस्ता का मागतोस?’ असा जाब विचारला. त्यानंतर सागर इंगोले याने आत्राम यांची कॉलर पकडली, तर महादेव इंगोले याने त्यांना पकडून ठेवल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यानंतर मधु इंगोले आणि मुरलीधर भट्ट यांनी वेळूच्या काठीने मारहाण करून आत्राम यांना जखमी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मारहाण सुरू असताना गावातील दोघांनी मध्यस्थी करून सोडवले

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मात्र, मारहाणीनंतरही धमकीचे सत्र थांबले नसल्याचा आरोप आहे. ‘जर तू उपोषणाला बसलास तर तुला मारून टाकीन,’ अशी जीवे मारण्याची धमकी दिल्याचे आत्राम यांनी तक्रारीत म्हटले आहे. घटनेनंतर आत्राम यांनी उपचार घेतले. त्यानंतर ते मारेगाव पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि घडलेल्या प्रकाराची तक्रार नोंदवली.

या प्रकरणी सागर महादेव इंगोले (30), मधु महादेव इंगोले (32), महादेव पुजाराम इंगोले (70) आणि मुरलीधर भट्ट (72), सर्व रा. चिंचाळा यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 मधील कलम 3(1)(r), 3(1)(s), 3(2)(va) तसेच भारतीय न्याय संहितेतील कलम 118(1), 3(5), 351(2), 351(3) आणि 352 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून, तक्रारीतील आरोपांची सत्यता तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

Comments are closed.