डीजे साउंडवरील निर्बंधांविरोधात उपोषण; आमदार बच्चू कडूंची भेट
सरसकट बंदी व अनावश्यक निर्बंध हटविण्याची मागणी
पुरुषोत्तम नवघरे, वणी : डीजे साउंड व्यवसायावर लादण्यात आलेल्या बंदी व निर्बंधांविरोधात वणी तालुका साउंड असोसिएशनच्या वतीने 7 ऑक्टोबरपासून आंदोलन सुरू करण्यात आले आहे. साउंड व्यावसायिकांना नियम व ध्वनी मर्यादांचे पालन करून व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी, तसेच सरसकट बंदी व अनावश्यक निर्बंध शिथिल करावेत, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. दरम्यान, 8 ऑक्टोबर रोजी आमदार बच्चू कडू यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली.
साउंड व्यवसायावर अचानक लादण्यात आलेल्या बंदीमुळे व्यावसायिकांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्याचे असोसिएशनचे म्हणणे आहे. या व्यवसायावर साउंड ऑपरेटर, लाईट, जनरेटर तसेच अन्य मजूर वर्ग अवलंबून असून, सुमारे 200 ते 300 कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याचा दावा असोसिएशनने केला आहे.
शासनाने निर्धारित केलेल्या ध्वनी मर्यादा व नियमांचे पालन करून साउंड वाजविण्यास परवानगी द्यावी, साउंडसाठी परवानगी मिळण्याची प्रक्रिया सुलभ व स्पष्ट करावी, तसेच नियमांचे पालन करणाऱ्या व्यावसायिकांवर विनाकारण किंवा भेदभावपूर्वक कारवाई करू नये, अशा मागण्या असोसिएशनने केल्या आहेत.
आमदार बच्चू कडू यांची उपोषणस्थळी भेट
संपूर्ण महाराष्ट्रात डीजे साउंड व्यवसायासाठी नियम व मार्गदर्शक तत्त्वांच्या चौकटीत परवानगी दिली जात आहे. मग यवतमाळ जिल्ह्यातच डीजे साउंड व्यवसायावर अशा प्रकारची बंदी का? नियमांचे उल्लंघन होत असेल तर संबंधितांवर कारवाई करा; मात्र नियमांचे पालन करणाऱ्या सर्व व्यावसायिकांना व्यवसायापासून वंचित ठेवणे अन्यायकारक आहे. अशी भूमिका बच्चू कडू यांनी मांडली.
संबंधित सर्व विभागांची बैठक घेऊन साउंड व्यावसायिकांच्या अडचणींवर तातडीने निर्णय घ्यावा आणि व्यवसायावर अवलंबून असलेल्या कामगार व इतर घटकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न लक्षात घ्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. प्रशासनाने मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा असोसिएशनने दिला आहे.


Comments are closed.