शुक्रवारी मारेगावात कँडल मार्च
महिलांवरील अत्याचारांच्या घटनेचा निषेध करण्यासाठी मारेगावकर एकवटले
मारेगाव: कठुआ, उन्नाव सारख्या बलात्काराच्या घटनेचा नागरिकांच्या मनात खदखदत असलेला असंतोष आता तीव्र होताना दिसत आहे. वणीनंतर आता मारेगावातही याची प्रतिक्रिया दिसू लागली आहे. आसिफाला न्याय मिळवून देण्याकरीता शुक्रवारी 20 एप्रिलला मारेगावात कॅन्डल मार्चचं आयोजन करण्यात आलं आहे. हा मार्च सायंकाळी सात वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून काढण्यात येणार आहे. बुधवारी मारेगावात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
काश्मीरच्या कठुवा येथे आसिफा नामक ८ वर्षांच्या मुलीवर माजी महसूल अधिकाऱ्याने अपहरण करुन पोलीस आणि नातेवाईक यांच्यासह अत्याचार करुन तिचा खून केल्याचा आरोप आहे. या नराधमांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना वाचविण्यासाठी मोर्चे काढण्यात येत आहेत. या दोन्ही घटना मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटना आहे. या घटनेचा निषेध करून आसिफाला न्याय मिळवून देण्याकरीता सर्व मारेगावकर कँडल मार्चचं आयोजन केलं आहे.
या मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, मनसे, कांग्रेस, भारिप, संभाजी ब्रिगेड, मुस्लिम परिषद, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, तसेच विविध सामाजिक संघटना सहभागी होणार आहे. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.