बंटी तामगाडगे, राजूरः 61 व्या धम्मदीक्षा सोहळादिन समारंभानिमित्त आयोजित धम्मपरिषदेत दोन सत्रांत दोन परिसंवाद झालेत. ‘‘सांस्कृतिक दहशतवादाच्या व धार्मिक मूलतत्ववादाच्या काळात बुद्ध-आंबेडकर विचारांनी परिपक्व समाज घडू शकतो’’ या विषयावर पहिला परिसंवाद झाला. ‘‘संविधान साक्षरता म्हणजे माणसाच्या नव्या जाणीवेची पहाट’’ या विषयावर दुसरा परिसंवाद झाला. यात आनंद गायकवाड, भूपंेद्र रायपुरे, धर्मराज निमसरकर, जावेद पाशा, प्रा. दिलीप चौधरी व विषयतज्ज्ञांनी सहभाग दर्शविला.
भूपेंद्र रायपुरे यांनी आजच्या काळात बुद्ध-आंबेडकरी विचारांच्या गरजेची उपयुक्तता स्पष्ट केली. बुद्धांचे विचार हे सार्वकालिक आहेत. आज जगात अनागोंदी माजलेली असताना बुद्ध-आंबेडकरी विचारांची उपयुक्तता स्पष्ट केली. भगवान बुद्धांनी दिलेला मार्ग हा मानवाला कसा उन्नत करू शकतो हे त्यांना सोदाहरण सांगितले.
धर्मराज निमसरकर यांनी संविधान साक्षरतेचे महत्त्व विषद केले. संविधानाच्या अनेक बारीकसारीक पैलूंवर त्यांनी यावेळी उपस्थितांशी चर्चा केली. भारतीयांच्या जीवनाला संविधानाची किती गरज आहे, यावर देखील त्यांनी संवाद साधला. संविधानात काय दिलं आहे, हे सगळ्यांनी जाणून घेतले पाहिजे असंही ते यावेळी म्हणाले.
प्रा. जावेद पाशा यांनी भारतीय संविधानातील विविध विषयांवर मुद्देसूद मांडणी केली. संविधानामुळे सामाजिक जीवनात झालेले बदल त्यांनी स्पष्ट केले. संविधानामुळे भारतीयांना किती पुढे जाता आलं हे त्यांनी सांगितलं. कितीतरी क्षेत्रांत भारतीयांसाठी वेगवेगळे आकाश खुले झाले असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
प्रा. दिलिप चौधरी यांनी मतदान आणि मताधिकार यामधील फरक स्पष्ट केला. भारतीयांनी आपल्या मताचे आणि मतदानाचे महत्त्व जाणून घ्यावे असेही ते म्हणाले. आपल्याला मिळालेला हा अत्यंत महत्त्वाचा अधिकार असल्याचेही ते म्हणाले.
या परिसंवादांचे संचालन प्रवीण नगराळे यांनी केले. आभार प्रदर्शन महेेश लिपटे सर यांनी केले. या परिसंवादाला विविध ठिकाणांहून श्रोते आलेत. तीन दिवस चाललेल्या या धम्मपरिषदेत विविध विषयांवर चर्चा, परिसंवाद, प्रश्नोत्तरे झालीत.