सुनील इंदुवामन ठाकरे, यवतमाळ: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्य १४ एप्रिल ते ५ मे दरम्यान राबविण्यात येत असलेल्या ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत ज्या गावात ८० टक्यापेक्षा अधिक दलितवस्ती आहे व गरीब कुटुंबांची संख्या अधिक आहे अशा जिल्हयातील १३ गावातील ७८८ घरांसाठी महावितरणची सौभाग्य योजना ही अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी ठरली.वर्षानुवर्षे अंधारात जीवन जगणाऱ्या कुटूंबाच्या जीवनांतील अंधार दुर झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान हे बघणाऱ्यांनाही समाधान देणारे होते.
असेच समाधान हे डेहणीतील हिरकणाबाईच्या चेहऱ्यावर बघायला मिळाले. जिल्हयातील बाभुळगाव तालुक्यातील डेहणी हे १३ गावांपैकी एक. येथील हिरकणाबाईच्या घरातील नशिबी अठरा विश्व दारिद्र असल्याने आपल्यापर्यंत फक्त स्वप्नात वीज पोहचू शकते असे माननाऱ्या हिरकणाबाईच्या दरवाज्यावर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी हाक दिली, अधीक्षक अभियंता रामेश्वर माहुरे , कार्यकारी अभियंता संजयकुमार चितळे, यांच्या उपस्थितीत ,सहाय्यक अभियंता एस. आर. बोवारे आणि त्यांच्या अधीनिस्त कर्मचाऱ्यांनी लगेच हातोहात मीटर बसविल्याने हिरकणाबाई आनंदाने भाराऊन गेल्या.
कुटूंबाच्या हलाखीच्या परिस्थितीने हिरकणाबाईचे जीवन हे कायम संघर्षाचे राहीले आहे. बेंबळा प्रकल्पामुळे डेहणी येथे पुनर्वसन झाल्याने मागील सहा वर्षापासून एका लहानशा झोपडीत आपले एकटे जीवन व्यतीत करीत आहे. वयाची ७० असतांना लटलट कापणाऱ्या हातालाही स्वताच्या उदरनिर्वाहासाठी रोज झटावे लागते. आपल्या शेजारच्या घरात वीज असताना मात्र ,आपले जीवन टिमटिमत्या घासलेटच्या चिमणीतच घालावे लागत होते. शेजारच्या गावातून आणावे लागत असलेले घासलेट कधी कधी मिळत नव्हते, परिणामी अशी कित्येक रात्र ही अंधारातच काढावी लागली. त्यामुळे हिरकणाबाईच्या घरात सौभाग्यातून पडलेल्या प्रकाशाने त्यांच्या चेहऱ्यावर समाधान न होणे हे नवलच .अशाच प्रकारे महावितरणची ‘ सौभाग्य योजना ‘ ही हिरकणाबाईसारख्या ७८८ कुटूंबाच्या जीवनाची प्रकाश वाट ठरली .
जिल्हयातील १०० टक्के विद्युतकरण झालेल्या दलित वस्तीमध्ये बाबुळगाव तालुक्यातील डेहणी ,कळंब तालुक्यातील शेराड, नेर तालुकयातील वटफळी, पुसद तालुक्यातील वालतुर, हुडी(ब), पांडुर्णा(ब), देवठाणा,जवळा,दगड धानोरा ,हीवळणी पलंम्पत, आणि उमरखेड तालुक्यातील मनयाली,करंजी , सावळेश्वर गावाचा समावेश आहे. या गावात वीज देण्यासाठी महावितरणच्या वतीने गावनिहाय मेळावे घेण्यात आले.