पोलिस ठाण्यात बारमाही शुद्ध आर ओ पाण्याची व्यवस्था डॉ. महेंद्र लोढा यांच्या सौजन्याने
गिरीश कुबडे, वणीः शहर व परिसर सध्या आग ओकत आहे. प्रत्येकाचा जीव तहानेने व्याकूळ झाला आहे. जणू पाणी विकतच घ्यावं लागतं अशी सर्वत्र स्थिती वणी शहरात निर्माण झाली आहे. शहराची ही अवस्था बघून राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेश सरचिटणीस तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ. महेंद्र लोढा यांनी आपल्या हॉस्पिटलसह, तालुक्यातील खेड्यांमध्ये व शहरातदेखील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे.
‘‘तहानलेल्यांना पाणी’’ हे गाडगेबाबांच्या दशसूत्रीतील एक प्रमुख सूत्र असल्याचं डॉ. लोढा वणी बहुगुणीशी बोलताना म्हणाले. त्यामुळेच लोककल्याणार्थ त्यांनी ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. त्याचाच एक भाग म्हणून वणी पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या सहकार्याने तिथे बारमाही शुद्ध आर ओ पाण्याची व्यवस्था केली.
वणी पोलिस ठाणे हे प्रशासकीय परिसरात आहे. तहसील, कोर्ट व पोलिस स्टेशन अशा कामांसाठी वणीसह पंचक्रोशीतील नागरिक इथे येतात. ड्युटीवर असलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनादेखील अनेकदा घरूनच पाणी आणावं लागायचं. त्यामुळे अत्यंत तातडीने डॉ. लोढा यांनी इथे कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून दिली. या पाण्याच्या सुविधेचे उद्घाटन करताना पी.एस.आय. निर्मल, पोलीस पाटील नितीन शिरभाते, स्वप्निल धुर्वे, पोलिस अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.