बांगड्या फुटल्या…. घागरी फुटल्या….. संयमाचे बांधही फुटले….
यवतमाळात पाण्यासाठी पालकमंत्र्यांच्या घरासमोर काँग्रेसचे आंदोलन
ब्युरो, यवतमाळः अनेक बांगड्या तडातडा फुटत होत्या….. घागरींवर घागरी फोडल्या जात होत्या….. मागणी होती ती फक्त पाण्याची. हे आंदोलन पुकारले होते काँग्रेसने. पाणी टंचाई सध्या शहरासह संपूर्ण जिल्ह्यात परमोच्च शिखरावर आहे. वापरण्याचे तर सोडाच पण पिण्याच्या पाण्याचेही वांधे सर्वत्र आहेत. या आधीदेखील नियमित पाण्याची मागणी झालीच होती. तेव्हा 30 एप्रिल पर्यंत पाणी पुरविठा सुरळीत करण्यााचे आश्वासन पालकमंत्री मदन येरावार यांनी दिले होते. आठवडा उलटला तरी जीवनावश्यक पाणीच मिळत नसल्याने काँग्रेसने पालकमंत्र्यांच्या घरासमोर घागरी आणि बांगड्या फोडून आंदोलन केले.
मागील वर्षी पाऊस खूपच कमी झाला. त्यामुळे निळोणा व चापडोह ही धरणे कोरडी झालीत. निसर्गाने साथ दिली नसल्याने विभागाकडून पाणीपुरवठा हा अनियमित होऊ लागला. दैनंदिन उपयोगासाठी आणि वाढतं ऊन बघता पाण्याची गरज पूर्ण होत नव्हती. त्यामुळे टँकरद्वारे पाणी पुरवठा करून जणू समज घातली जात होती. हा टँकरद्वारा होणारा पाणीपुरवठादेखील अनियमितच होता. शेवटी नागरिकांनी आपला रोष अशा आंदोलनातून व्यक्त केला.
पाणीप्रश्नाला काँग्रेस राजकीय स्टंट करीत असल्याचा आरोप पालकमंत्र्यांनी केला. सध्याच्या घडीला गोखी धरणाचे पाणी आणले असल्याचे त्यांनी सांगितले. बेंबळा प्रकल्पाचे पाणीदेखील लवकरच पोहोचेल असेही त्यांनी सांगितले. सर्वांना पाणी मिळेलच असे पालकमंत्री म्हणाले. पाण्याचा प्रश्न हा सध्या सर्वत्रच भेडसावत आहे. त्यामुळे या पाणीटंचाईतून मुक्ती कशी मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.