वणी मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची लिटमस टेस्ट
ज्येष्ठ पत्रकार अशोक आकुलवार यांचे नवे सदर 'अन्वयार्थ'
अशोक आकुलवार (विशेष प्रतिनिधी): बुधवारी 23 मे रोजी वणी येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी वणी मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेला येईल असे केलेले वक्तव्य केले. खरं म्हणजे धनंजय मुंडेंनी वणी मतदारसंघासाठी केलेली ही राजकीय लिटमस टेस्ट आहे. परंपरेने वणी मतदारसंघ हा आघाडीच्या राजकारणात काँग्रेसच्या वाट्याला येत आहे. कर्नाटकामधील राजकीय नाट्यानंतर महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणार हे आता अटळ राजकीय सत्य ठरणार आहे. आणि याच पार्श्वभूमीवर वणी मतदारसंघावरती राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारी सांगितलेला दावा काँग्रेसचा गोटात खळबळ निर्माण करणारा ठरू शकतो.
वणी मतदारसंघाच्या राजकीय इतिहासाने 2004 आणि 2014 ची निवडणूक वगळता 1990 पासून काँग्रेसलाच झुकते माप दिले आहे. असे असले तरीही 1990 ते 2014 पर्यंत झालेल्या सहा निवडणुकींचा आलेख पाहिल्यास काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या मतदानामध्ये सातत्याने घसरण झालेली दिसून येत आहे. 1999 पासून संजय देरकरांच्या रुपाने राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेले मतदान पाहिल्यास त्यांच्याही टक्केवारीत घसरण झाल्याचे दिसून येत आहे.
1990 मध्ये काँग्रेसला 50.79 टक्के मते मिळाली, तर 1995 मध्ये या टक्केवारीत तब्बल 18 टक्कांची घसरण होऊन या निवडणुकीत काँग्रेसच्या पदरात 32.23 टक्के मते आली. असे असले तरीही 1995च्या निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार निवडून आला होता. सन 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना होऊन लगेचच या पक्षाला विधानसभा निवडणुकीला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे पहिल्यांदाच काँग्रेसच्या संस्कृतीतूनच तयार झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने राज्याच्या विधानसभा मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले होते. त्यावेळेला वणी विधानसभा मतदारसंघातून प्रथमच संजय देरकर यांच्या रुपाने राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार दिला. या 1999 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या विजयी उमेदवाराला 36.43 टक्के मते तर राष्ट्रवादी काँग्रेसला 25.59 टक्के मते प्राप्त झाली होती.
वणी विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासात 2004ची निवडणूक अभूतपूर्व ठरली होती. या निवडणुकीत काही अंतर्गत राजकीय समिकरणे होऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजय देरकर यांनी आपली उमेदवारी ऐन वेळी मागे घेतली होती. यावेळी या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला असला तरीही काँग्रेसच्या उमेदवाराला या निवडणुकीत 35.04 टक्के मते मिळाली होती. 2009 च्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली असली तरीही राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय देरकर हे अपक्ष म्हणून उभे राहिले. तेव्हा त्यांना 23.71 टक्के मते मिळाली. तर काँग्रेसचे विजयी उमेदवार वामनराव कासावार यांना 31.93 टक्के मते मिळाली. 2014च्या निवडणुकीत मोदी लाटेने काँग्रेससोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतांच्या टक्केवारीत कमालीची घसरली होती.
2014च्या या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला अनुक्रमे 20 टक्के व 16.02 टक्के मते मिळाली होती. या आकड्यांच्या विष्लेषणातून असे दिसते की काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची एकत्रीत मते जवळपास 36 ते 52 टक्क्यांच्या मध्ये राहिली. याच आकड्यांचा आधार घेऊन आणि विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करण्यासाठी वणी मतदारसंघावर या कार्यकर्ता मेळाव्यात धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा जाहीरपणे सांगितला. परंतु काँग्रेसही आपला दावा सहजासहजी सोडणार नाही. कारण 1990 ते 2014 या कालावधीतील सहा विधानसभा निवडणुकींमध्ये काँग्रेस तब्बल चार वेळा विजयी ठरले.
सध्या वणीच्या काँग्रेसमध्ये राजकीय उदासिनता दिसल्याचे चित्र आहे. तर संजय देरकरांनी एक ते दीड वर्षांपुर्वीच वणीची राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या स्तरावर विसर्जित केली होती. त्यामुळे या दोनही काँग्रेसची राजकीय पोकळी निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत होते. परंतु मागील तीन महिन्यांपासून डॉ. महेंद्र लोढा यांनी सातत्याने वणी विधानसभा मतदारसंघ पिंजून काढत बुधवारी धनंजय मुंडे यांच्या साक्षीने शक्तीप्रदर्शन केले. काँग्रेसमधील राजकीय सुस्तीचा आणि नव्याने उभारी घेतलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दिसून आलेला नवा जोश धनंजय मुंडे यांना वणीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा करण्यापासून परावृत्त करू शकला नाही. परंतु वणी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहजासहजी पदरात पडेल असे चित्र नाही.
1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून हा पक्ष जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लढवित आहे. तरी देखील वणी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्हा परिषद व पंचायत समितीवर एकही उमेदवार निवडून आणता आला नाही. याला काही वेळात वणी नगर परिषदेची निवडणुक अपवाद जरी असली, तरी राष्ट्रवादी काँग्रेसला ग्रामीण भागात नव्या जोमाने व मर्यादित काळात पक्ष बांधणी करावी लागेल.
संजय देरकरांनी वणीची राष्ट्रवादी काँग्रेस विसर्जित केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते इतर राजकीय पक्षांच्या तंबुत आपसूकच गेले. यातील चांगल्या कार्यकर्त्यांना पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षात आणून त्यांना कामाला लावले पाहिजे. कधीकधी केवळ उपक्रमशिलताही विजयपथावर नेत नाही याचा अनुभवही वणीच्या राजकारणात दोनदा आलेला आहे. या अनुभवातूनही सध्याच्या वणीच्या राष्ट्रवादी काँग्रेसने धडा घेण्याची गरज आहे. ही उपक्रमशीलता अभिनंदनीय असली तरीही या उपक्रमशीलतेतून प्रस्थापित राजकीय व्यवस्थेविरुद्ध वणीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कितपत जनआक्रोश निर्माण करू शकतात, यावरही या पक्षाची पुढील वाटचाल अवलंबून राहणार आहे.
धनंजय मुंडेंच्या जाहीर दाव्यानंतर काँग्रेसही आता कामाला लागेल यात शंका नाही. काँग्रेसचे नेते वामनराव कासावार यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवावी व एखाद्या चांगल्या कार्यकर्त्याला वणी विधानसभा लढवू द्यावी असा जोरदार मतप्रवाह काँग्रेसमध्ये निर्माण झाला आहे. परंतु वामनराव कासावारांसाठीही लोकसभा रणक्षेत्र सोपे असणार नाही. चंद्रपूर-आर्णी लोकसभा मतदारसंघात येणा-या 6 विधानसभा मतदारसंघापैकी 4 विधानसभा मतदारसंघ चंद्रपूर जिल्ह्यात तर केवळ दोन मतदारसंघ यवतमाळ जिल्ह्यात आहे. हा भौगोलिक असमतोलही काँग्रेसला अनुकुल असणार नाही. त्यामुळे वामनराव कासावारही सहजासहजी आघाडीच्या राजकारणात वणी मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जाऊ देणार नाही. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरू झालेल्या या रस्सीखेचीत वणी विधानसभा मतदारसंघ कुणाच्या वाट्याला येतो हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरेल.