कोडपाखिंडी येथील जिल्हा परिषद शाळेचे छत कोसळले
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील कोडपाखिंडी येथील जिल्हा परिषद शाळेचे छत कोसळले. या घटनेला कारणीभूत संबंधित अभियंता व ठेकेदार असल्याची तक्रार शाळा सुधार समितीसह गावकऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे. जिल्हा परिषद शाळा सुधारण्याकरिता जिल्हा परिषद निधीतून मान्सून निधी मिळाला. सदर निधी प्राप्त होताच शाळा सुधारण्याकरिता शाळा सुधार समिती व गावकऱ्यांनी कोणत्या प्रकारे व कसे बांधकाम करून शाळा दुरुस्त करावी याबाबत संबंधित अभियंता व ठेकेदारांना सूचना केल्यात. परंतु या सुचनांकडे लक्ष न देता अती जीर्ण झालेल्या भिंतीवर कोणतेही कॉलम न घेता जुन्या विटांच्या भिंतीवर स्लॅब टाकण्याचा प्रयत्न केला असता सदर स्लॅब कोसळला. त्यावेळी शाळेचे विद्यार्थी नव्हते. नाहीतर मोठी हानी झाली असती.
महाराष्ट्रासह तालुक्याला भ्रष्टाचाराने पोखरले असून प्रत्येक कामात कमिशन पद्धत सुरू आहे. ज्यामुळे निकृष्ठ पद्धत्तीची कामे सुरू आहेत. तालुक्यात अशा किती जिल्हा परीषद शाळांना निधी मिळाला व अशा बोगस पद्धतीची कामे सुरू आहेत, हेसुद्धा तपासणे गरजेचे झाले आहे. सदर कामात अभियंता व ठेकेदार यांनी संगनमत करून निधी हडपण्याचा प्रयत्न केला असून संबंधित शाळेची चौकशी करून निधी हडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या अभियंता व ठेकेदारावर गुन्हे दाखल करण्याची मागणी शाळा सुधार समितीचे अध्यक्ष पवन प्रमोद राऊत, उपाध्यक्ष अहिल्या रमाकांत गेडाम, सागर प्रमोद राऊत, बाळू अय्या टेकाम दोन्ही सदस्य व गावकऱ्यांनी केली आहे.