विलास ताजने, (शिंदोला)- वणी तालुक्यातील शिंदोला लगतच्या येनक आणि एसीसी परिसरात अस्वलाचा मुक्त संचार असल्याचे दिसून आले आहे. बुधवारला सायंकाळी साडेसहा वाजता चणाखा येथील प्रितम निमकर या युवकाला कंपनीच्या पंप हाऊस जवळ अस्वल दिसले. परिणामी शेतकरी, गुराखी यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या पेरणीचा हंगाम सुरू आहे. जंगली श्वापदे पेरलेल्या बियाणांची नासाडी करीत आहे. त्यामुळे शेतकरी रात्रकाळात शेतात जागल करण्यासाठी ये-जा करतात. तसेच एसीसी कर्मचारी रात्र पाळीत कामावर ये-जा करतात.त्यामुळे मानवाच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. वनविभागाने अस्वलाचा बंदोबस्त करण्याची परिसरातील ग्रामस्थांची मागणी आहे.