मजरा ते राजूर रस्त्याचे लोकार्पण

मजरावासीयांचा 13 किमीचा फेरा वाचणार

0

विवेक तोटेवार, वणी: मंगळवारी मजरा ते राजूर या पांदण रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा पार पडला. लोकसहभाग आणि डॉ. लोढा यांच्या सहकार्यातून हा रस्ता तयार करण्यात आला  आहे. या रस्त्यामुळे मजरा ते राजूर असा सुमारे 13 किमीचा फेरा वाचणार आहे. गावक-यांनी केवळ 96 तासांमध्ये हा रस्ता तयार केला आहे.

मजरा ते राजूर या मार्गावर परिसरातील अनेक शेतक-यांच्या शेती आहे. मात्र इथे रस्ता नसल्याने पावसाळ्यात शेतात जाण्यासाठी शेतक-यांना मोठी कसरत करावी लागायची. रस्त्यावर चिखल होत असल्याने बैलगाडीला देखील इथून जाणं येणं करणं जिकरीचं होतं. सोबतच राजूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने या भागातील लोकांना आरोग्य केंद्रात चिखल तुडवून जावे लागायचे किंवा मग 13 किलोमीटरचा फेरा मारून जावे लागायचे. मात्र आता मजरा-राजूर हा रस्ता डॉ. लोढा यांच्या सहकार्यातून व लोकसहभागातून तयार झाल्याने हे अंतर केवळ तीन किमीचे झाले आहे.

मंगळवारी संध्याकाळी सहा वाजता गावात डॉ. महेंद्र लोढा यांचे आगमन झाले. आगमन होताच त्याचे हारतुरे घालून गावक-यांनी जोरदार स्वागत केले. गेल्या अनेक वर्षांपासूनची गावक-यांची रस्त्याची मागणी पूर्ण झाल्याने गावात जल्लोषाचं वातावरण होतं. संध्याकाळ झाल्याने गावाने तयार केलेल्या रस्त्याच्या कडेला लाईटची व्यवस्था केली होती. फटाके फोडून आणि पेढे वाटून गावक-यांनी हा क्षण साजरा केला. लोकार्पण सोहळ्यानंतर एक छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला. यात डॉ. लोढा यांचा शाल व श्रीफळ देऊन सपत्नी सत्कार करण्यात आला.

यावेळी डॉ. लोढा म्हणाले की…

मजरा ते राजूर हा रस्ता बांधून पूर्ण झाला याचे संपूर्ण श्रेय हे गावक-यांना जाते. मी केवळ निमित्त आहे. त्यांनी एकजूट दाखवल्यानेच हे काम पूर्ण करता येऊ शकले. यापुढेही लोकसहभागातून कोणतेही काम करायचे असल्यास मी केवळ मजरावासीयांसाठीच नाही तर इतरांसाठीही कार्य करण्यास नेहमी तत्पर राहिल. हे रस्ते बनल्याने गावातील माझ्या शेतकरी बांधवांना शेती करणे अधिक सोयीस्कर झाले. याचा मला आनंद आहे.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयसिंगजी गोहोकर म्हणाले की…

राजकारणात आता ख-या अर्थाने शिक्षित लोकांनी येण्याची गरज आहे. डॉ. लोढा हे केवळ उच्चशिक्षितच नाही तर त्यांना लोकांच्या समस्यांची जाण आहे. लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ते रोज गावखेड्यांच्या भेटीगाठी घेत आहे. त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. त्यातून लोकसहभागातून जे कार्य शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न करीत आहे. मजरा गावातील लोकांनी जसा सहभाग दर्शविला तसा सहभाग जर इतर गावातूनही मिळाला तर लवकरच परिसराचा चेहरामोहरा बदलवण्यात आम्हाला नक्कीच यश येईल.

 

तर ग्रामंपचायत सदस्य अनिल देऊळकर यांनी डॉ लोढा यांचे आभार मानत या रस्त्यामुळे शेतीचे काम सुलभ तर होणारच आहेत. शिवाय राजूर येथील दवाखान्यात जाण्याकरीता पडणारा 13 किमीचा फेरादेखील वाचणार आहे. तसेच कार्य करण्यासाठी पदाची नाही तर इच्छाशक्तीची गरज आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमात महेश पिदुरकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

श्रमदान करताना गावकरी

या कार्यक्रमामध्ये डॉ. महेंद्र लोढा, ज्येष्ठ नेते जयसिंग गोहोकर, महेश पिदुरकर, राजाभाऊ बिलोरिया, स्वप्निल धुर्वे, राजूभाऊ उपरकर, संगिता खटोड, विजयाताई आगबत्तलवार, सूर्यकांत खाडे, सोनू निमसटकर, मोहाडे, सिराज सिद्धीकी, शम्स सिद्धीकी यांच्यासह सरपंच सुरेखा देउळकर, ज्ञानेश्वर कसारे, जीवन खिरटकर, अनिल मनोहर देऊळकर, स्वप्निल महारतळे, प्रफुल्ल मोहितकर, निलेश काकडे, दत्ता देऊळकर, दिलिप पानघाटे, अरुण सूर्यवंशी आणि गावकरी उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.