रक्षकच निघाला भक्षक, पोलीस अधिका-यावर गुन्हा दाखल

लाच मागणे आणि अपहरणाचा गुन्हा दाखल

0

मारेगाव: मारेगाव पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षकावर लाच मागितल्या प्रकरणी तसेच तक्रारदाराचे अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवार संध्याकाळची ही घटना आहे. लाचलुचपत विभागाने ही कार्यवाही केली असून आरोपी पोलीस अधिकारी सध्या फरार आहे.

सविस्तर वृत्त असे की 20 दिवसांआधी पोलिसांद्वारे बोअरवेलमध्ये बनावट पाईप टाकण्या-या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला होता. मारेगावातील शिवशक्ती बोअरवेल फर्मद्वारा बनावट (साध्या पाईपवर नामांकित कंपनीचे स्टिकर लावून) पाईपची विक्री सुरू होती. याबाबत यवतमाळ येथील स्वस्तिक पाईप इंडस्ट्रिजचे संचालक जितेश पतिरा यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार कार्यवाही करीत पोलिसांनी मारेगावातील शिवशक्ती बोअर फर्मवर छापा टाकून हलक्या व निकृष्ट दर्जाचे 14 पाईप जप्त केले होते. या प्रकरणी शिवशक्ती बोअरवेल फर्मचे संचालक रमेश (तामिळनाडू) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मारेगाव पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक राहुलकुमार राऊत (30) यांनी बनावट पाईप प्रकरणात आरोपी न करण्याबाबत तक्रारदार अगडेला दहा हजारांची लाच मागितली होती. तक्रारदाराने याची माहिती लाचलुचपचत प्रतिबंधक विभागाला दिली. त्यानुसार राऊत यांना रंगेहात पकडण्यास सापळा रचण्यात आला. मंगळवारी संध्याकाळी राऊत हे तक्रारदार अगडे व त्याचा मित्र झळके यांना बळजबरीने अज्ञातस्थळी घेऊन गेले. सापळा रचल्याची कुणकुण राऊत यांना लागताच त्यांनी तक्रारदाराजवळ पुरावा म्हणून रेकॉर्डिंगसाठी असलेला रेकॉर्डर आणि मोबाईल पुरावा नष्ट करण्यासाठी हिसकावून घेतला व ते फरार झाले.

लाच मागणे, पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने शासकीय रेकॉर्डर व मोबाईल हिसकावून घेणे, अज्ञातस्थळी बळजबरीने घेऊन जाणे या कारणावरून लाचलुचपत विभागाच्या पोलीस निरीक्षक अस्मिता नगराळे यांच्या तक्रारीवरून सहायक पोलीस निरीक्षक राहुलकुमार राऊत यांच्याविरुद्ध कलम 7 लाचलुचपत प्रतिबंधक कायदा, 1988 आणि भादंवि कलम 392, 365,186, 201 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

सदर कार्यवाही श्रीकांत तिडके अपर पोलीस अधिक्षक, आरबी मुळे पोलीस उपअधिक्षक लाचलुचपतविभाग यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अस्मिता नगराळे, आणि कर्मचारी शेषराव सोयाम, निलेश पखाले, अनिल ठाकूर, किरण खेडकर, भारत चिरडे, महेश वाकोडे, विशाल धलवार लाचलुचपत विभाग यवतमाळ यांनी केली.

याआधीही घडली होती अशीच घटना
गेल्यावर्षी एका बलात्कार प्रकरणी आरोपी न करण्याबाबत मारेगावातील एका पोलीस कर्मचा-याने आणि जमादाराने लाच मागितली होती. या प्रकरणी पोलीस कर्मचारी आणि जमादारास निलंबित करण्यात आले होते. योगायोग म्हणजे या प्रकरणातील निलंबित पोलीस कर्मचा-याचे आडनाव देखील राऊतच होते. सलग दुस-या वर्षीही असेच एक प्रकरण उजेडात आल्याने मारेगाव पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.