मारेगाव: कलावती बांदुरकर यांच्या मुलीने आत्महत्या केल्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. कलावती बांदुरकर यांच्या आत्महत्याग्रस्त शेतक-यांची विधवा असून त्यांच्या घरी राहुल गांधी यांनी भेट दिल्याने त्या अचानक प्रकाशझोतात आल्या
होत्या.
कलावती बांदुरकर यांची मुलगी पपिता रामटेके वय (28) यांनी दुपारी 4.30 दरम्यान आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मारेगाव येथील जुन्या कोर्ट परिसरातील सिडाना यांच्या शेतातील विहिरीत उडी मारली, मात्र ही घटना परिसरातील काही लोकांच्या लक्षात आली. त्यांनी लगेच पपिताला वाचवण्याचा प्रयत्न केला.
काही वेळातच लोकांनी पपिताला बाहेर काढून याची माहिती मारेगाव पोलीस ठाण्याला दिली. पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तिला पोलीस ठाण्यात आणले. यावेळी पोलिसांनी तिची विचारपूस केली असता तिने माझी कोणाविरोधात ही तक्रार नसल्याचे सांगितले. तसेच मी आत्महत्येचा प्रयत्न केला याची माझ्या आईला कल्पना देऊ नका असेही सांगितले. विचारपूस केल्यानंतर पपिताला तिच्या पतिकडे स्वाधीन करण्यात आले. आत्हत्येचं कारण अद्याप कळू शकलं नसलं तरी तिने घरगुती वादातून हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे.
कोण आहेत कलावती बांदुरकर ?
कलावती बांदुरकर या यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील जळका येथील रहिवाशी आहेत. त्यांच्या पतिने 2005 मध्ये सततच्या नापिकीने आणि कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या केली होती. 2008 साली त्यांची भेट राहुल गांधी यांनी घेतली
होती. त्यानंतर जेव्हा राहुल गांधी यांनी याबद्दल संसदेमध्ये माहिती दिली तेव्हा एकच खळबळ उडाली होती. कलावती अचानक प्रकाशझोतात आल्या. देशभरातील मीडियाचे पाय जळका गावाकडे वळू लागले होते. त्यांचा पोस्टर वुमन म्हणून वापर
होऊ लागला. त्यांना आर्थिक मदत देखील मिळाली होती.
कलावती यांना आठ मुलं होते. त्यातील दोघांचा आधीच मृत्यू झाला आहे. तर काही वर्षांआधी त्यांच्या जावयाने देखील आत्महत्या केली होती. त्यानंतर त्यांच्या दोन मुलींचा देखील मृत्यू झाला.