डॉ. महेंद्र लोढा यांनी स्वीकारले विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्त्व
विवेक तोटावारः वाढत्या महागाईत शिक्षण हे दिवसेंदिवस अधिकाधिक महाग होत चाललं आहे. सामान्य मध्यमवर्गीय व गरीब पालकांना आपल्या मुलांना शिकवताना फारच तारेवरची कसरत करावी लागते. केवळ आर्थिक अडचणीमुळे अनेकांना आपले शिक्षण अर्ध्यावरतीच सोडावे लागते. सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांनी ही बाब लक्षात घेता परिसरातील काही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्त्व स्वीकारले. त्यांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली.
यातील एक विद्यार्थीनी इयत्ता सहावीला तर दुसरी इयत्ता तिसरीला आहे. संपूर्ण शिक्षण होईपर्यंत यांची जबाबदारी डॉ. लोढा यांनी स्वीकारली. तसेच वाणिज्य शाखेत प्रथम वर्षाला शिकत असलेल्या एका विद्यार्थीनीला आवश्यक शैक्षणिक साहित्य त्यांनी दिले. कोणतीही राजकीय सत्ता हातात नसताना डॉ. लोढा यांनी स्वबळावर आणि लोकसहभागातून रस्ते, वीज, पाणी, आरोग्य अशा अनेक सुविधा सुदूर भागातील लोकांना दिल्यात. शिक्षणाबद्दलची त्यांची तळमळ बघता त्यांनी याही क्षेत्रात आपले कार्य सुरू केले. तालुक्यातील दरा-साखरा येथील सहावीतील भाग्यश्री मोहुर्ले आणि तिचा तिसऱ्या वर्गातील भाऊ तुषार याला त्यांनी शैक्षणिक व पूरक साहित्य भेट दिले. आई-वडलांचे छत्र हरवलेल्या या लेकरांची जबाबदारी त्यांच्या वृद्ध आजोबांवर आली. त्यांनी डॉ. लोढांकडे विनंती केली. त्यांच्या विनंतीचा आदर करीत डॉ. लोढा यांनी त्या विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारले.
इयत्ता बारावीत 78 टक्के गुण मिळवणाऱ्या गोपिका सोमय्या हिला बॅग, नोटस्, रजिस्टर्स, पुस्तके, छत्री, कॅल्क्युलेटर, असे आवश्यक साहित्य दिले. तिच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारीदेखील त्यांनी स्वीकारली. गोपिका हिचे पितृछत्र हरवले. तिच्या कुटुंबाची जबाबदारी तिच्या आईवर आली. गोपिकाला पार्टटाईम रोजगार मिळवून देण्याचे आश्वासनही डॉ. लोढा यांनी दिले. प्रा. रविंद्र मत्ते यांनी वाणिज्य शाखेत शिकत असलेल्या या विद्यार्थीनीची तिन्ही वर्षांच्या शिकवणीची जबाबदारी स्वीकारली.
या कार्यक्रमाला डॉ. महेंद्र लोढा, ज्येष्ठ नेते जयसिंग गोहोकर, राजाभाऊ बिलोरिया, प्रा. रविंद्र मत्ते, स्वप्निल धुर्वे, राजू उपरकर, संगिता खटोड, विजया आगबत्तलवार, सूर्यकांत खाडे, सोनू निमसटकर, मोहाडे, सिराज सिद्धीकी, शम्स सिद्धीकी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.