मारेगाव: मारेगाव तालुक्यात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जनजीवन चांगलेच विस्कळीत झाले आहे. तर नगरपंचायतीचे पावसाळी नियोजन शून्य असल्याने त्याचा चांगलाच फटका नागरिकांना बसला.
मारेगावातील वार्ड क्र. 4 मध्ये रस्त्याची दुरवस्था आहे. त्यातच मुसळधार पावसाने या परिसरातील लोकांची चांगलीच पंचायत केली आहे. मुसळधर पावसाचे पाणी लोकांच्या घरात शिरल्याने या भागातील लोकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. तसंच वार्ड क्रमांक 11 येथील बीएसएनएल ऑफिस परिसरातील सखल भागात देखील पाणी साचल्याची माहिती मिळत आहे.
मुसळधार पाऊस येणार म्हणून नगरपंचायतीने योग्य ती उपाययोजना करण्याची गरज होती. मात्र नगरपंचायतीने याकडे दुर्लक्ष केले. परिणामी परिसरात पावसाचे पाणी साचले. नाल्या, सांडपाणी यावर कोणतीही उपाययोजना न केल्याने हे पाणी पावसाच्या पाण्यासह लोकांच्या घरात गेले. अशी माहिती परिसरातील रहिवाशी बलकी आणि मेश्राम यांनी वणी बहुगुणीला दिली. या भागातील समस्येकडे लक्ष द्यावे अशी मागणी परिसरातील लोक करीत आहे.