विवेक तोटेवार, वणी: रविवारपासून सुरू असलेल्या पावसाने वणीत कहर केला असून यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. वणी-गणेशपूर हा पूल संपूर्णतः पाण्याखाली गेला असून सध्या या पुलावरून दिड ते दोन फुटांवरून पाणी वाहत आहे. त्यामुळे या परिसरात राहणा-यांना धोका निर्माण झाला आहे. तर वणीची जीवनदायिनी निर्गुडा नदी दुथडी भरून वाहत आहे. वणीला जरी पुराचा धोका नसला तरी नदी परिसरातील वस्ती जलमय झाली आहे व या परिसराला धोका निर्माण होऊ शकतो.
वणील वणीतील लहान विवेकानंद हायस्कूल, दामले फैल, मोमीनपुरा या भागात पावसाचे पाणी साचले आहे. उंच रस्ते असल्यामुळे व तुंबलेल्या नाल्यांमुळे पाणी थेट घरात शिरले. दमछाक करणा-या पावसाने संपूर्ण वणीकरांची तारांबळ उडाली. मोकळ्या मैदानांना छोट्या तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तर वणीतील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. टिकळ चौकातील खड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.
वणीच्या सीमावर्ती भागातील नवीन टाऊनशीप ले आऊट व वस्त्यांमध्ये पाण्याचे योग्य नियोजन नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मारूती टाऊनशीप ते गणेशपूर पर्यंत निर्गुडा नदीवर सुरक्षा भिंत टाकली आहे. ती भिंत जवळपास पूर्ण भरण्याच्या मार्गावर आहे. त्यातील केवळ दीड ते दोन फुटांची भिंत बाकी आहे. या भिंतीला तडे गेले आहे. जर ही भिंत कोसळली तर पाण्याचा पूर्ण लोंढा या टाऊनशीपमध्ये शिरण्याचा धोका संभवतो.
सध्या आपातकालीन स्थिती नसली तरी कोणतीही प्रिव्हेंटींव्ह ऍक्शन प्रशासनाकडून घेतली गेली नाही. नगरपालिकेसोबतच तहसील प्रशासनाचेही याकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे त्यांनी या प्रश्नाकडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी सामाजिक कार्यक्रते आणि बसपाचे प्रवीण खानझोडे आणि शिवसेनेचे राजू तुराणकर यांनी केली आहे.
लिंकवर क्लिक करून पाहा पाण्याचा व्हिडीओ..