प्रयोगशील संपादक अविनाश दुधे

कवी, लेखक आणि मुक्त पत्रकार सुनील इंदुवामन ठाकरे यांचा लेख

0
मा. अविनाश दुधे, यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. जवळपास 15 वर्षांपूर्वी अमरावतीला ते लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून आले. त्यावेळी मी लोकमत युवा मंचाचा अमरावती जिल्हा संयोजक होतो. तिथेच पहिली भेट.
 
फारच टेक्निकल आणि कोरडी वाटली ही व्यक्ती सुरवातीला. पण हळूहळू कळायला लागली त्यांच्या लिखाणाची ताकद. चित्रलेखा, लोकमत आणि दै. पुण्यनगरीचे आवृत्ती संपादक, मास कम्युनिकेशन अॅण्ड जर्नालिजमचे प्राध्यापक, मीडिया वॉचचे संपादक आणि प्रकाशक अशी त्यांची कारकीर्द मी पाहिली.
 
काही ना काही प्रयोग सतत सुरूच असतात यांचे. ‘‘पाहून घेऊ पुढची पुढं’’ असाच त्यांचा निर्भीड बाणा अनेकांनी अनुभवला. आता मी ठरलो टिप्पीकल कवी. त्यांच्यातला रसिक मला सापडतच नव्हता. एखाद्या ऑन ड्युटी सैनिकासारखे पत्रकार एके पत्रकार. पत्रकार दुणे पत्रकारिता हाच त्यांचा पाढा.
 
‘‘मीडिया वॉच’’ या नियतकालिकांतून सातत्याने वेगळे विषय त्यांनी प्रकाशात आणले. पूर्वी ते याच नावाने स्तंभदेखील लिहायचे. ‘‘मीडिया वॉच’’चे दिवाळी अंक निघायला सुरुवात झाली. टिप्पिकल दिवाळी अंकांची परंपरा मोडत ‘‘मीडिया वॉच’’ने आपली स्वतःची ओळख निर्माण केली. लहान लेकरं दिवाळीला ज्या आतुरतेने नवे कपडे, फटाके, गिफ्टस् आणि स्वीटस्ची वाट पाहतात, त्याहीपेक्षा वाचक ‘‘मीडिया वॉच’’च्या दिवाळी अंकाची.
 
मा. अविनाश दुधे यांना ‘‘उपद्व्यापी” संपादक’’ म्हणणे म्हणजे माझे धाडसच म्हणावे लागेल. पण जग चालतंय ना तसंच चालू दे अशी सामान्य वृत्ती असते. पण या जगाच्या चालण्यात जर काही खटकणारं असेल आणि त्यावर कोणी भाष्य करून रोखत व टोकत असेल तर त्याला आजच्या जमान्यात ‘‘उपद्व्याप’’च म्हणतात. ‘‘जिथे खटकलं, तिथेच हटकलं’’ ही आदर्श पत्रकारिता होय. हे मा. अविनाश दुधे आपल्या संपूर्ण कारकीर्दीत करीतच आहेत. सामान्यजनांच्या लेखी हा ‘‘नसता उपद्व्याप”च होय.
 
आईन्स्टाईनने जेवढे प्रयोग केले असतील त्यांच्या वैज्ञानिक शोधांसाठी तेवढेच प्रयोग मा. अविनाश दुधे यांनी पत्रकारितेत केले आणि करीतच आहेत.
 
यांच्या वाढदिवसाच्या लगेच दुसऱ्या दिवशी 14 जुलै 2018 ला धनवटे सभागृह, राष्ट्रभाषा संकुल, शंकर नगर चौक, नागपूर येथे सायंकाळी -5 ते 7 ला एक प्रकाशन सोहळा आणि चर्चासत्र त्यांनी आयोजित केले. तारीख केवळ सोय आणि योगायोग आहे.
 
मीडिया वॉच पब्लिकेशनचं एका नव्या पुस्तकाचं संपादन त्यांनी केलं. ‘‘संघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का?’’ या पुस्तकाचा हा प्रकाशन सोहळा. या संपादित पुस्तकाला ज्येष्ठ पत्रकार संपादक मा. सुरेष द्वादशीवार यांची या पुस्तकाला प्रस्तावना आहे.
 
मा. अविनाश दुधे यांच्यातल्या सम्यक पत्रकाराचा वारसा त्यांनी आपल्या प्रकाशकाच्या व ग्रंथ संपादकाच्या भूमिकेतही कायमच ठेवला. ‘‘हिंदू राष्ट्र’’ म्हटलं, की दोन्ही बाजूच्या लोकांच्या भुवया उंचावतात. या दोन्ही बाजूच्या लोकांच्या ओठांच्या हालचाली प्रतिक्रिया देण्यासाठी सज्ज होतात.
 
मी पत्रकारितेची पदवी घेत असताना आम्हाला पत्रकारितेच्या अनेक पैलूंचं ज्ञान देण्यात आलं. त्यात एक भाग होता, की जर कोणत्या विषयाबद्दल लिहायचे किंवा बोलायचे असेल तर दोन्ही पक्षांचं काय म्हणणं आहे ते मांडलंच पाहिजे. मा. अविनाश दुधे यांनी हे समर्थपणे सांभाळलं. ‘‘संघ’’ म्हटल्याबरोबर संघाबद्दल आपुलकी असणारा एक गट आहे. संघाचा विरोध करणाचा दुसरा गट आहे. हे आपापल्या ठिकाणी त्याचे समर्थन किंवा विरोध करत असतात.
 
‘‘संघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का?’’ हे पुस्तकाचे शीर्षकच मुळी चर्चेचा विषय आहे. त्यामुळे कोणत्याही एका बाजूचेच मत घेऊन ते एककल्ली होऊन अन्याय्यी व्हायला नको याची जबाबदारी संपादक आणि प्रकाशक या नात्याने मा. अविनाश दुधे यांनी घेतली. ज्येष्ठ पत्रकार मा. सुरेश द्वादशीवार यांची सुरुवातीला प्रदीर्घ, अभ्यासपूर्ण तसेच अनुभवसंपन्न प्रस्तावना आहे.
 
मा. दत्तप्रसाद दाभोलकर यांचा ‘‘सनातन धर्म कधीच पराभूत झाला नाही’’, ज्येष्ठ पत्रकार मा. मा. गो. वैद्य यांचा ‘‘हिंदू राष्ट्र प्राचीन काळापासून अस्तित्वात’’, मा. रावसाहेब कसबे यांचा ‘‘संघाच्या हिंदू राष्ट्राचा आधार चातुर्वर्ण्यच ’’ मा. संजय सोनवणी यांचा ‘‘हिंदू राष्ट्र कि वैदिक राष्ट्र’’, मा. शेषराव मोरे यांचा ‘‘पण, हिंदू राष्ट्र म्हणजे काय?’’ मा. पुरुषोत्तम खेडेकर यांचा ‘‘हिंदुराष्ट्राच्या बुरख्याआड वैदिक राष्ट्र उभारणीचा घाट’’, मा. रमेश पतंगे यांचा ‘‘ भारत हिंदुराष्ट्रच’’ आणि मा. रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांचा ‘‘हिंदुराष्ट्र – अनिष्ट तसेच अशक्यही’’ असा हा अनुक्रम या पुस्तकात आहे.
 
हा प्रकाशन सोहळ्याच्या आयोजकांमध्ये मा. आशुतोष शेवाळकर, मा. अरुणा सबाने, मा. अतुल लोंढे, मा. मिलिंद कीर्ती, मा. अविनाश दुधे, मा. संतोष अरसोड, मा. नितीन पखाले, मा. प्रदीप पाटील, मा. अतुल विडुळकर ही मंडळी आहे.
 
या पुस्तकाची आणि चर्चासत्राची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. या प्रकाशनसोहळ्याला, या चर्चासत्राला आणि मा. अविनाश दुधे आणि त्यांच्या संपूर्ण टीमला आणखी एका नव्या आणि वेगळ्या ‘‘उपद्व्यापासाठी’’ सदिच्छा.
 
मा. अविनाश दुधे सरांना फक्त ‘‘वाढदिवसाच्या सदिच्छा’’ एवढंच लिहून थांबणार होतो. पण ओघानेच दोन-चार ओळी आणखी वाढल्या. हॅप्पी बर्थ डे मा. अविनाश दुधे.
 
थँक्स
 
सुनील इंदुवामन ठाकरे
 
8623053787 &
9049337606

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.