ब्युरो, नागपूर: सर्वच धर्मातील कडवेपणा आता संघटित होत आहे. सर्व धर्मातील कडवे लोक आपल्यातील उदारमतवाद्यांना पहिल्यांदा मारतात. हे भारतातील लोकशाहीला मारक आहे. ही हिंदू राष्ट्राकडे नव्हे तर नाझी राज्याकडे वाटचाल आहे, असे परखड प्रतिपादन जेष्ठ संपादक सुरेश द्वादशीवार यांनी आज नागपूर येथे केले.
मीडिया वॉच पब्लिकेशनच्या बहुचर्चित ‘संघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल?’ या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, रा.स्व. संघाचे माजी अ. भा. बौद्धिक प्रमुख मा. गो. वैद्य, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र रुख्मिनी पंढरीनाथ, संपादक अविनाश दुधे उपस्थित होते.
पुढे बोलताना द्वादशीवार म्हणाले, विचारांमध्ये फार स्पष्टता असावी लागते व महितीही पुरेपूर असावी लागते, ती संघाची नाही. गांधी किंवा गोडसे यातील एकाचा स्वीकार संघाने जाहीरपणे करावा. मात्र त्यांची भूमिका गुळमुळीत असते. सर्वमूल्य समभाव हे आपले मूल्यच नाही तर राष्ट्रीय धोरणही आहे. धर्म हा माणसांचा असतो. जगात धर्मांची संख्या 4300 आहे. जगात सर्वात मोठा धर्म ख्रिश्चन असून त्यांची लोकसंख्या 200 कोटी आहे. २ऱ्या क्रमांकाचा मुस्लिम धर्म असून त्यांची लोकसंख्या135 कोटी आहे. जगात धर्मनिरपेक्ष लोकसंख्या 114 कोटी आहे. त्या नंतर हिंदू धर्माचा क्रमांक लागतो. त्याची लोकसंख्या 93 कोटी आहे. म्हणजे जगात धर्मनिरपेक्ष लोकसंख्या वाढत आहे, असे द्वादशीवार म्हणाले.जगातला कोणताही धर्म सनातन नाही, असे द्वादशीवार यांनी सांगितले.
ज्या काळात सर्व ग्रंथ लिहिले गेले ते ज्ञाना ऐवजी श्रद्धेच्या अंगाने लिहिले गेले. जगात 14 हजार युद्धांचा इतिहास आहे. त्यातील साडेबारा हजार युद्ध केवळ धर्माच्या नावावर झाली. धर्माने जेवढी माणसे मारली तेवढी कशानेही मेली नाहीत. एकट्या 14 व्या शतकात धर्मयुद्धाने 40 लक्ष माणसे मारली गेली. आपल्या देशात 50 पत्रकार गेल्या काही वर्षात मारले गेले. ते बहुतांश हिंदू होते. गोडसेने गांधींना का मारले, जिनांना का नाही मारले, याचाही विचार करायला हवा. कोणत्याही संघटनेत कडवे, समन्वयवादी, वादी, संवादी कोण आहेत हे ओळखता आले पाहिजे. देशावर प्रेम करणारे आणि विरोध करणारे असे वर्गीकरण करण्याचा अधिकार संघाला दिला कोणी? काँग्रेसमधून किंवा कोणत्याही पक्षातून भाजपात गेलं तर माणूस हिंदू होतो का? असा प्रश्नही द्वादशीवार यांनी उपस्थित केला. आपला विवेक महत्वाचा आहे. आयुष्यात दोन प्रकारची मूल्य असतात- एक जन्माने दिलेलं आणि दुसरे न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, राष्ट्रीयता, नीती या खऱ्या मूल्यनिष्ठा. सुदैवाने आपल्या देशात विवेकाची, धर्म सुधारण्याची परंपरा मोठी आहे. केवळ निधर्मी माणूस म्हनून आपल्याला अधिक जागृत राहावे लागणार आहे. संघ, भाजपला हिंदू पाकिस्तान हवा आहे, असे शशी थरूर म्हणाले, यात गैर काय? कोणी काय बोलावे हे सुद्धा संघ, भाजपा ठरवेल का? या देशातील न्याय व्यवस्था, माध्यमे सत्ताधार्यांनी कुचकामी करून ठेवली आहेत, अशी टीका त्यांनी केली. मात्र यांचा शेवट जवळ असतो त्यांना कोणी सनातन म्हणत नाही. या जगात केवळ माणुसकीचाच धर्म सनातन आहे, असेही द्वादशीवार यांनी सांगितले.
मा. गो. वैद्य यावेळी बोलताना म्हणाले, आपण मनुचे वंशज आहोत. संघाचे हिंदू राष्ट्र हे स्वप्न नाही वस्तुस्थिती आहे. राष्ट्र आणि राज्य यात गोंधळ होतो. मात्र या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहे. राज्य हे राजकीय संस्था आहे. तर राष्ट्र म्हणजे लोक. राष्ट्र ही जिवंत संकल्पना. धर्म आणि रिलीजन यातील फरक समजून घेतला पाहिजे. रिलीजन हा धर्माचा एक भाग आहे. धर्म ही व्यापक संकल्पना आहे, असे ते म्हणाले.
पुरुषोत्तम खेडेकर यांनी मराठा सेवा संघ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या विचारमूल्य खूप वेगळे असल्याचे सांगितले. या देशातील माणूसच एक नाही तर हिंदुराष्ट्राचे स्वप्न कसे साध्य होईल? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. हिंदुराष्ट्राबद्दल RSS च्या संकल्पना कोणत्या? हे संघाने स्पष्ट केले पाहिजे असे ते म्हणाले. पुरोगामीत्व म्हणजे केवळ हिंदू, ब्राह्मणांना शिव्या घालणे असा बहुजनांचा प्रचार करण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला यश आले आहे, अशी टीका त्यांनी केली. संघाचे अंतरंग संघासाठी तन, मन, धनाने काम करणाऱ्या 99.99 टक्के स्वयंसेवकांनाही माहित नाही, हे वास्तव असल्याचे त्यांनी सांगितले.धर्म, राज, समाज, शिक्षण, माध्यम या पाचही संस्था सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दावणीला आहे, असे ते म्हणाले. मुसलमान आणि ख्रिश्चन हे आपले शत्रू आहेत ही मानसिकता संघाने देशात तयार केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या खोटे पणाला कोणी पुरून उरेल असे सध्यातरी दिसत नाही. तरीही सर्वांना लढावे लागेल, असे ते म्हणाले. भारतीय म्हणून एकमेकांतील वाद विसरून एकत्र येऊ, तरच लोकशाही टिकेल, असे ते म्हणाले.
रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांनी हिंदू राष्ट्राचा विचार आणखी दृढ झाला तर या देशातील लोकशाही नष्ट होण्याची भीती आपल्या भाषणातून व्यक्त केली.विविध विचारधारांचा संवाद मीडिया वॉच पुढे नेत आहे, असे ते म्हणाले. संघाची मूळ स्थापणाच गांधींच्या विरोधासाठी झाली. जगाच्या समृद्ध परंपरेला तोडणारी हिंदू राष्ट्राची संकल्पना आहे. गांधी हे खरोखर प्रात:स्मरणीय असतील तर नथुराम आमचा नाही हे जाहीर केलं पाहिजे, असे आव्हान त्यांनी दिले. तुमचा हिंदू धर्म कोणता? तुम्ही दाभोळकरांच्या बाजूचे आहेत का.? प्रश्न मूल्यांचा आहे. जागतिकीकरनानंतर आलेल्या लाटेने, या विरोधात स्थानिक, जातीय, धर्मीय अस्मिता उभ्या राहिल्या.
आपण लोकांपर्यंत जाऊन त्यांना समतेच्या मार्गावर नेणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.हिंदुत्ववादाचा विचार संघाने एकदा तपासून घ्यावा, असा सल्लाही त्यांनी दिला. देशात धार्मिक उन्माद प्रचंड वाढला. कट्टरवादाची स्पर्धा सुरू झाली तर फार वाईट दिवस येतील. लोकशाहीचा अवकाश वेगाने संपविण्याचे काम सध्या होत आहे. असे झाले तर देशाचे तुकडे होतील, असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुरुषोत्तम खेडेकर आणि मा. गो. वैद्य आज प्रथमच एका मंचावर आले होते. कार्यक्रमाला माजी खासदर विलास मुत्तेमवार, डॉ. शरद निंबाळकर, सुधाकर गायधनी, चंद्रकांत वानखडे, सुरेश चौगुले, डॉ. सुगन बरंठ, विजय तांबे, प्रदीप खेलूरकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मीडिया वॉचचे संपादक अविनाश दुधे यांनी केले. संचालन अतुल विडूळकर यांनी केले, तर आभार अरुणा सबाणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आशुतोष शेवाळकर, रमेश बोरकुटे, मनीषा शेवाळकर, सुनील इंदुवामन ठाकरे आदींनी परिश्रम घेतले.