विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील केसुरली येथे शेतात घर करून राहणाऱ्या शेतकऱ्याच्या घर फोडून चोरट्यांनी 70 हजारांचा ऐवज लंपास केला. शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली. फिर्यादीच्या तक्रारीवरून वणी पोलिसात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
वणी तालुक्यातील केसुरली या गावातील पंढरी बाबाराव गोहणे (41) हे आपल्या शेतातच घर करून राहतात. शनिवारी सायंकाळी पंढरी हे गावात भजनासाठी गेले होते. भजनानंतर ते घरी येऊन झोपले होते. सकाळी 6 वाजताच्या दरम्यान त्यांना जाग आली. त्यांनी घराच्या बेडरूममध्ये पाहिले असता त्यांना घराचा मागचा दरवाजा उघडा दिसला. तसेच आलमारी उघडी असल्याचे दिसले.
त्यांना धक्का बसला त्यांनी लगेच आलमारी तपासली असता त्यात त्यांना आलमारीतून 12 ग्रॅम सोन्याचा गोप किंमत 10 हजार, सोन्याची पोत 25 ग्रॅम किंमत 50 हजार, कानातील रिंग 3 ग्रॅम किंमत 3 हजार व नगदी 7 हजार असा एकूण 70 हजाराचा माल चोरी गेल्याचे आढळले.
त्यांनी त्वरित वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 457, 380 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.