नगराध्यक्षांच्या कक्षात रंगले विषनाट्य, उडाला थरकाप

आधी रॉकेलनाट्य, आता विषनाट्य...

0

तालुका प्रतिनिधी, मारेगाव: गुरुवारी सकाळी मारेगाव येथील नगरपंचायत कार्यालयात चांगलेच नाट्य रंगले. एका तरुणाने नगराध्यक्षाच्या चेंबरमध्ये विष घेण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात एका महिलेने रॉकेल ओतून आत्महत्या करण्याची धमकी नगरपंचायत कार्यालयात दिली होती.

प्रभाग क्रमांक 4 मध्ये कुंडलवार ही महिला राहते. ती सकाळी घरासमोरील नाली काढा अशी मागणी घेऊन नगरपंचायत कार्यालयात पोहोचली. त्याच महिलेच्या घराजवळ उरकुडे नामक तरुण राहतो. कुंडलवार नगरपंचायतीमध्ये पोहोचताच उरकुडे हा देखील कार्यालयात पोहोचला. जर नगरपंचायतीने नाली काढली, तर मी विष घेईल अशी धमकी नगराध्यक्ष रेखा मडावी व प्रभागाचे नगरसेवक भारत मत्ते यांना दिली. त्यामुळे तिथे एकच खळबळ उडाली. त्यातच भर म्हणून कुंडलवार ही महिला चक्कर येऊन पडली. त्यामुळे वातावरण आणखीनच गंभीर झाले.

काय आहे हे प्रकरण ?
संततधार पावसामुळे प्रभाग क्रमांक 4 मध्ये पाणी साचले होते. हे पाणी काढण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाने जेसीबीच्या सहाय्याने तात्पुरती नाली काढली होती. मात्र त्याही वेळी एका महिलेनं तिच्या घरासमोर तयार झालेली नाली बुजवली. त्यामुळे ते प्रकरण नगरपंचायत कार्यालयात आलं. तेव्हा त्या महिलेनेही प्रभाग नगरसेवक व मुख्याधिकारी यांना राकॅल ओतून आत्महत्या करण्याची धमकी दिली होती.

आता या प्रभागात नाली काढणारे आणि त्याला विरोध करणारे असे दोन्ही पक्ष आमनेसामने आले आहे. त्यामुळे करावं तरी काय या बुचकाळ्यात नगरपंचायत पडलं आहे. या कारणामुळे आता नगरपंचायत प्रशासनाच्या अडचणी वाढल्या आहेत. अशातच विष घेण्याचे धमकी प्रकरण समोर आल्याने शहरात हा चर्चेचा विषय झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.