विदर्भातील परिवर्तनवादी कार्यकर्त्यांची बैठक गुरूवारी नागपुरला
दिनांक २ आॅगस्ट २०१८ला संध्या. सहा वाजता कस्तुरबा भवन , बजाजनगर , नागपूर येथे
संदीप बर्वे यांची भूमिका: नागपुरमधील बजाजनगर भागातील कस्तुरबा भवन हे सामाजिक कार्यक्रम आणि उपक्रमांचे केंद्र आहे. महा. गांधी स्मारक निधी या संस्थेची ती शाखा आहे. गांधीजींच्या हत्येनंतर त्यांच्या जीवनकार्याच्या प्रेरणेतून सामाजिक कार्य चालावे , यासाठी ही संस्था सुरू झाली. युवक क्रांती दल ही संघटना १९६७ साली सुरू झाली. सामाजिक अन्यायाच्या अनेक प्रश्नावर गांधीजींच्या सत्याग्रही मार्गाने आंदोलने झाली. ते सर्व प्रश्न सुटले. आजही नोकरभरती , पुनर्वसन , स्कोलरशिप अशा मुद्द्यांवर युक्रांदचे लढे सुरू आहेत. महा. गांधी स्मारक निधी आणि युक्रांद या संस्था – संघटना राज्यभरात सामाजिक कार्याची केंद्र उभी करत आहेत. नागपुर येथील कस्तुरबा भवन येथे याच भूमिकेतून बैठक आयोजित करण्यात आली आहे. उपस्थित कार्यकर्त्यांनी विचारविनिमय करून या बैठकीत विविध कार्यक्रम आणि उपक्रमांची आखणी करावी असा प्रयत्न असेल.
नागपूर येथील स्थानिक कार्यकर्त्यांची टीम यात पुढाकार घेईल. विदर्भातील इतर जिल्ह्यातील कार्यकर्ते त्यात नियमित सहभागी होतील आणि राज्यातील इतर भागातील उत्साही कार्यकर्तेही या कामात योगदान देतील अशी कल्पना आहे. २००४ पासून मी विदर्भात येतोय. बाबा आमटे यांच्या सोमनाथ श्रमसंस्कार शिबिरात सहभागी झालो. विदर्भात अनेक मित्र बनले, समाजकार्याचे प्रकल्प अभ्यासता आले. मी नियमित यायला सुरूवात केली. कस्तुरबा भवन शाखेचे सचिव सुनील पाटील यांच्या मदतीने विविध कार्यक्रम घेतले. यामध्ये शिबिरे , अभ्यासवर्ग , व्याख्यानांचा समावेश होता. यवतमाळ येथे महेश पवार आणि अमरावती मध्ये आमदार बच्चू भाऊ कडू , राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा मोझरी आश्रम येथील कार्यक्रमात सहभाग घेतला.
गडचिरोलीत लोकयात्रा आणि शोधयात्रा या दोन अभ्यासदौऱ्यात आरंभापासून शेवटपर्यंत सहभागी होतो. गडचिरोलीत डॉ. अभय बंग यांचे आणि मेंढा लेखा गावाचे’ आमच्या गावात आम्हीच सरकार ‘ या आंदोलनाचे कार्य पाहीले. शेगावचे दर्जेदार अध्यात्मिक काम पाहून प्रभावित झालो. अमरावतीतील अविनाश सावजींचे “प्रयास” आणि अमोल मानकर यांचे अकोल्यातील “समर्पण” संस्थेचे कार्य महत्वपूर्ण वाटले. बुलडाण्यातील पाणीप्रश्नावर काम केले. नुकताच कोल्हे दांपत्याचे मेलघाट येथील काम आणि चंद्रपूर – अमरावती येथील हरीश बुटले यांच्या साद माणुसकी अभियानाचे काम नुकतेच पाहीले.
मी जन्माने उत्तर आणि पश्चिम महा. असूनही मला विदर्भाची संस्कृती अधिक भावते. विदर्भ ही समाजकार्याची पंढरी आहे. २००८ पासून मी राज्यभरात जीवनदानी कार्यकर्ता म्हणून युवक संघटन बांधतो आहे. विविध आंदोलनातून सात हजार तरूणांचे प्रश्न सोडवले आहे. भारतीय संविधानाशी बांधील असलेली १८ ते ३५ वयोगटातील एक लाख तरूणांची समतावादी , आशावादी , विधायक , ध्येयवादी , सकारात्मक युवक युवतींची शक्ती मला उभी करायची आहे. १८ ते ३५ चा वयोगट यात महत्वाचा असला तरी सर्व वयाच्या संवेदनशील आणि सकारात्मक कार्यकर्त्यांचे योगदान यात महत्वपूर्ण असेल. विदर्भातील अशा ३०० कार्यकर्त्यांचे शिबिर घेऊन सर्व जिल्ह्यांमध्ये दौरे करण्याचा संकल्प आहे.
या कामात सर्वांचे योगदान आवश्यक असेल. या सर्व चर्चेसाठी २ ऑगस्टच्या बैठकीत आपण सर्वांनी समविचारी मित्रांना घेऊन यावे, ही विनंती. अधिक माहितीसाठी मला फोन करावा. मी आपल्या सकारात्मक प्रतिसादाची वाट बघेन.
जिंदाबाद ! –
संदीप बर्वे ,
मोबाईल नंबर 9860 387 827