बहुगुणी डेस्क उमरेडः एरवी गृहप्रवेश म्हटला की अवाढव्य कर्मकांड करण्याची प्रथाच झाली आहे. मात्र एकही कर्मकांड न करता वैचारिक सोहळ्याने येथील हरिदास व मनीषा पांगूळ यांनी गृहप्रवेश केला. यानिमित्ताने कवी व निवेदक सुनील इंदुवामन ठाकरे यांनी जगद्गुरू तुकोबारायांच्या निवडक अभंगांचे निरूपण केले. अभंगवाचन प्रा. संजीव कोंडेकर यांनी केले.
शिवधर्मगाथेत सांगितल्या प्रमाणे मराठा सेवा संघाचे स्थानिक अध्यक्ष हरिदास पांगूळ यांनी गृहप्रवेशाची प्रक्रिया केली. या वास्तूच्या बांधकामात ज्यांचे ज्यांचे सहकार्य लाभले अशा आप्तगण, इंजिनिअर्स, गवंडी व मजुरांना भेटवस्तू देऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
प्रा. काेंडेकरांनी अभंगवाचन केल्यावर सुनील इंदुवामन ठाकरे यांनी त्यावर सार्थ व वर्तमान भाष्य करीत निरुपण केले. आपल्या दैनंदिन आयुष्यात जे अभंग प्रेरणा देतात त्या अभंगांची निवड या प्रसंगी करण्यात आली. डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या पुस्तकातील निवडक अभंग यावेळी निरुपणासह वाचण्यात आले.