विवेक तोटेवार, वणी: नझुल धारकांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहे. त्यांना कायमस्वरूपी पट्टे देण्याबाबत केवळ आश्वासने देण्यात आली होती. मात्र आता लवकरच नझुलधारकांचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे. नझुल जागेवर असलेल्या नागरिकांना पट्टे मिळवून देण्याबाबत नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी मुख्याधिकारी यांना निर्देश दिले आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला नझुल धारकांच्या पट्याचा प्रश्न आता सुटू शकतो.
वणी शहरातील बहुसंख्य कुटुंब हे नझुलच्या जागेवर आहेत. त्यांना संरक्षीत करण्यासाठी विविध कायदे करण्यात आले आहेत. तसेच त्यानुसार अतिक्रमणाधारकांना पट्टे देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. मात्र त्या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने अतिक्रमण धारकांना पट्टे मिळू शकले नव्हते.
झोपडपट्टीत राहणा-या तसेच मागास वस्तीत राहणा-या लोकांचे जीवनमान उंचवावे यासाठी अनेक योजना आहेत. झोपडपट्टी पूनर्वसन तसेच मागास व्यक्तींसाठी असणा-या विविध योजनेद्वारे त्यांना लाभ मिळायला हवा या उद्देशाने नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर आणि आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या सूचनेनुसार पुढाकार घेत नझुलधारकांचा प्रश्न निकाली लावण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी नगर पालिकेचे मुख्याधिकारी संदीप बोरकर यांना विविध योजनेद्वारे नझुलधारकांना पट्टे मिळवून देण्याबाबत निर्देश दिले आहेत. नझुलधारकांना पट्टे देण्याबाबत विविध कागदपत्रांची पूर्तता करून याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिका-यांकडे पाठवणे. तसेच या कामाबाबत जिल्हाधिका-यांकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्याचे निर्देश दिले आहेत.