तेलंगणात पायदळ जाणारे २० बैल पोलिसांनी पकडले
पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत जनावर तस्करीत मोठी वाढ
सुशील ओझा, झरी: ४ सप्टेंबर रोजी रात्री २ वाजता दरम्यान वणी उपविभागीय अधिकारी यांच्या पथकाने पाटण पोलीस स्टेशनच्या हद्दीत बिरसाईपेठ फाट्याजवळ तेलंगणात पायदळ कत्तलीसाठी नेत असलेले २० बैल ताब्यात घेतले आहे. याची किंमत सुमारे चार लाख रुपये आहे. यावेळी जनावर घेऊन जाणारे उमेश चापले वय २६ रा. मारेगाव, वसंता आत्राम वय ५६ रा. भालेवाडी रा. मारेगाव यांना पोलिसांनी अटक केली आहे. सदर बैल श्रीराम गौरक्षण संस्था रासा येथे टाकण्यात आले होते. विशेष म्हणजे ही जनावरे काही पोलीस कर्मचार्यांना दोन महिन्याचे पैसे न दिल्यामुळे पकडल्याची चर्चा पोलीस वर्तुळातच ऐकला मिळत आहे.
एका अधिकाऱ्याच्या नावाने जनावर तस्कराकडून दरमहा पैसा जमा करून आपसात वाटून घ्यायचे. परंतु दोन महिन्याचे पैसे न दिल्याने मारेगावच्या तस्करांचे हे २० बैल पकडल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. तस्करांकडून अधिकाऱ्याच्या नावाने घेत असलेली रक्कमेची माहिती त्या अधिकाऱ्याला सुद्धा माहीत नाही. यावरून काही कर्मचारी वैयक्तिक संमंध ठेऊन व अधिकाऱ्याच्या नावावर पैसा उकळून जनावर तस्करीला पाठबळ देत असल्याचे दिसत आहे.
यवतमाळ जिल्ह्यात पाटण पोलीस स्टेशन जनावर, गुटखा, तांदुळ, गांज्या तस्करीत पुढे असल्याचे उघड झाले आहे. तालुक्यातील दिग्रस पुलावरून अनंतपुर मार्गे चार चाकीने तर शिबला सुरदापुर मार्गे पायदळ जनावर तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्याना माहीत असून थातूरमाथुर कार्यवाही करून सोडल्या जात आहे. तालुक्यातील या तस्करीबाबत ‘वणी बहुगुणी’ने वेळोवेळी पाठपुरावा केला. परंतु काही दिवस जनावर व इतर तस्करी बंद केली जाते व काही दिवसानंतर पुन्हा सुरू केली जाते.
जनावर तस्करी मारेगाव, बोरी, पांढरकवडा, वणी, उमरी, कळंब, राळेगाव, येथील असून सर्व तस्करांचे मोबाईल क्रमांक बहुतांश पोलीस कर्मचारी व काही अधिकारी जवळ आहे परंतु “मी नाही त्यातली कडी लावा आतली ” सारखे नाटक करून आडमाप पैसा कमविण्याच्या मागे लागले असून त्याकरिता खुलेआम चारचाकी ऐवजी पायदळ जनावर तस्करीत प्रचंड वाढ झाली आहे.