सुशील ओझा, झरी: आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी दत्तक घेतलेलं गाव अडेगावपासून खडकी पर्यंत ५ किमीचा रोड तयार करण्यात आला. मात्र दोन महिन्यांतच सदर रोड उखडला आहे. अनेक ठिकाणी यावरचे डांबरी कोट निघून रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे लहान मोठ्या अपघाताची शक्याता निर्माण झाली आहे.
तालुक्यातील सर्वात मोठे गाव मुकुटबन तर दुसऱ्या क्रमांकाचे गाव अडेगाव आहे. या गावाला जाण्याकरिता गेल्या २५ वर्षांपासून व्यवस्थित रस्ते नव्हते. ज्यामुळे परिसरातील आमलोन, खातेरा, चिलई, तेजापूर, गाडेघाट, वेदड, व खातेरा या गावात जाणे कठीण झाले होते. अखेर दोन महिन्यांपूर्वी अडेगाव ते खडकी हा रस्ता तयार करण्यात आला. मात्र हा रस्ता निकृष्ट दर्जाचा तयार झाल्याने रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. तसेच रस्त्याची गिट्टी उघड्यावर पडून या रस्त्यावरून जाणे कठीण झाले आहे.
या रस्त्याने मोठ्या प्रमाणात ऑटोने शाळकरी विद्यार्थांना मुकुटबनला शिक्षणाकरिता जावे लागते. रोडकाम करणाऱ्या ठेकेदाराने रोडमध्ये निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याने रस्त्याची ही परिस्थिती झाल्याचा आरोप गावकरी करत आहेत. निकृष्ट रस्त्यामुळे गावकरी संतापले असून या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी गावकरी करीत आहे. तसेच या प्रश्नी प्रशासनाने लक्ष दिले नाही तर आंदोलनचे पाऊल उचलले जाईल असाही इशारा गावक-यांनी दिला आहे.