बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील नगरवाचनालयात मंगळावारी 25 सप्टेंबरला ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. यात केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्यासह आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती. वणीकरांसाठी आनंदाची बाब म्हणजे वाचनालयाला खासदार व आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून 2 लाख 17 हजार रुपयांचे ग्रंथ व 1 लाख 67 हजारांचे फर्निचर मिळाले आहे.
उद्घाटन प्रसंगी बोलताना केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर म्हणाले की् मनाचे योग्य ते पोषण होणे गरजेचे आहे. जर तसे झाले नाही तर मनुष्य उदास होतो. त्याचे मन भरकटत जाते, अशा साहित्य मनाची भूक भागविण्याचे काम ग्रंथ वाचनामुळे होते. वाचनामुळे मनावर योग्य ते संस्कार होतात. वैभवशाली देश निर्माण करण्यात वाचनाचा मोठा सहभाग असतो. त्यामुळे ही वाचनसंकृती जपणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला माजी केंद्रीय राज्यमंत्री स्व. शांतारामजी पोटदुखे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाचनालयाचे अध्यक्ष माधव सरपटवार यांनी केले. त्यानंतर आ.बोदकुरवार यांच्या वाढदिवसानिमित्त वाचनालायतर्फे शाल, श्रीफळ, ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर हंसराज अहिर व तारेंद्र बोर्डे यांचाही वाचनालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
प्रमुख अतिथी म्हणून बोलताना तारेंद्र बोर्डे म्हणाले की पुस्तके अथवा ग्रंथ यांच्या सारखा दुसरा गुरु नाही. ग्रंथामुळे आपल्या ज्ञानात भर पडते, म्हणूनच ग्रंथ हा आपला जवळचा मित्र आहे. आजच्या पिढीत वाचन हे बोरिंग ॲटम आहे अशी धारणा झाली आहे. ती बदलली पाहिजे. महान व्यक्तींचे आत्मचरित्र वाचा. त्यामुळे समाज सुधारणा होते. देशाला प्रगतीपथावर नेण्याचं बळ मिळते. यासोबतच त्यांनी वाचनालयातील उपक्रमांचे कौतुक करून वाचनालयाला यापुढे असेच उपक्रम सुरू ठेवावे. यासाठी कोणतीही मदत लागल्यास ते करण्यास आम्ही कटीबद्ध असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले.
अध्यक्षीय भाषणात आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार म्हणाले की सर्व साहित्य वाचणे गरजेचं आहे. वाचन हे भविष्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे. विविध विषयातील साहित्य वाचून ज्ञान समृध्द व्हा. वणी शहरातील शैक्षणिक, सामाजिक, उपक्रमासोबत वाचन संस्कृती वाढविण्यासाठी नगर वाचनालय सतत प्रयत्नशील राहते. आजची ग्रंथ प्रदर्शनी हे त्याचेच प्रतिक आहे. असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे संचालन वाचनालयाचे सचिव गजानन कासावार यांनी केले. आभार संचालन हरिहर भागवत यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने वणीकरांनी हजेरी लावली होती.