शहीद बाबुरावजी शेडमाके यांच्या पुतळ्याचे नुतनीकरण व सुशोभिकरण
डॉ. लोढा यांच्या प्रयत्नाने फुलला परिसर...
बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यातील विरकुंड येथे बाबुरावजी शेडमाके यांच्या पुतळ्याचे नुतनीकरण आणि परिसराचे सुशोभिकरण करण्यात आले. याबाबत गुरुवारी संध्याकाळी अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव आणि गावकरी उपस्थित होते.
इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे व भारताच्या स्वातंत्र्य युद्धात गोरगरीब व आदिवासी बांधवांना सोबत घेऊन इंग्रजांशी युद्ध पुकारणारे शहीद बुरावजी शेडमाके यांचा विरकुंड येथे पुतळा आहे. मात्र आर्थिक अडचणींमुळे या पुतळ्याकडे दुर्लक्ष झालं होतं. आदिवासी समाजातीलच नव्हे तर इतर समाजातील लोकांसाठीही त्यांचे कार्य प्रेरणादाई आहे. त्यामुळे पुतळ्याच्या नुतणीकरण आणि परिसराच्या सुशोभिकरणासाठी विरकुंड गावातील लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांची भेट घेतली. डॉ. लोढा यांनी पुढाकार घेत जबाबदारी स्वीकारली. अखेर पुतळा नुतनीकरण व परिसर सुशोभिकरणाचे काम पूर्ण झाले.
जुना झालेल्या पुतळ्याला रंगरंगोटी, दागडुजी करण्यात आली. पुतळ्याचा परिसरात झाडे झुडपे वाढली होती. तो परिसर गावक-यांच्या मदतीने संपूर्ण परिसर स्वच्छ करून त्यात वृक्षारोपण करून सुशोभिकरण करण्यात आले. परिसराला कंम्पाउंड करण्यात आले. तसेच जनावरांचा त्रास होऊ नये व पुतळ्याची देखभाल व्हावी यासाठी नवीन गेट बसवण्यात आले.
मंगळवारी विरकुंड येथे अभिवादन व उद्घाटन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. महेंद्र लोढा होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. रविंद्र मत्ते व विलास कालेकर, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विरकुंडचे माजी सरपंच संतोष परचाके होते. सोबतच पोलीस पाटील साधना सातपुते, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विजय लोहांडे यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.
उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉ. महेंद्र लोढा म्हणाले की…
आदिवासी बांधवांचा इतिहास हा संघर्षदायी आहे. त्या इतिहासापासून बोध घेण्याची आज गरज आहे. बाबुराव शेडमाके, बिरसा मुंडा यांचे पुतळे हे समाजाला प्रेरणा देतात तर विचार हे विचार हे प्रेरणेसोबतच दिशाही देतात. त्यामुळे पुतळ्यापेक्षा विचार टिकले पाहिजे. शहीद बाबुराव शेडमाके यांनी अन्यायाविरोधात पुकारलेले बंड असो किंवा त्यांचा स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग असो. त्यांच्या विचारातून समाज घडणे गरजचे आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की याआधीही मी नेहमी आदिवासी बांधवांसाठी काही ना काही कार्य करत आलो आहे व यापुढे ही करत राहणार.
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आदिवासी समाज बांधव व गावकरी उपस्थित होते. तर् कार्यक्रमाचे आयोजक विरकुंड येथील अशोक उईके यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संभाजी साडदुलकर, विनोद कुचनकर आणि गावक-यांनी परिश्रम घेतले. शेवटी गावक-यांनी डॉ. लोढा यांची वैयक्तिक भेट घेत आभार मानले व भविष्यात सर्व ताकदीने पाठिशी उभे राहणार असल्याचे वचन दिले.