बहुगुणी डेस्क, वणी: नवरात्र म्हटलं की सर्वांच्या डोळ्यासमोर येतो तो गरबा आणि दांडिया. नवरात्रात गरबा खेळला नाही तर नवरात्रीची धमाल काही पूर्ण होत नाही. मात्र गरबा, दांडियाचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण नसलं तर मात्र हे पारंपरिक नृत्य काही फुलत नाही. त्यामुळे खास वणीकरांसाठी जेसीआयतर्फे गरबा आणि दांडियाचं मोफत प्रशिक्षण आयोजित केलं आहे.
वणीत नवरात्रीमध्ये जेसीआय तर्फे बस स्टँग मागील नगरवाला जिनिंग नं 1 इथे दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून 26 सप्टेंबरपासून वणीतील एसबी लॉनमध्ये गरबा दांडिया प्रशिक्षणाला सुरूवात झाली आहे. हे प्रशिक्षण 9 तारखेपर्यंत सुरू राहणार आहे. वणीतील ग्लॉरिअस अकाडमीचे ट्रेनर सध्या प्रशिक्षण देत आहे. तर हैदराबाद येथील सुप्रसिद्ध कोरिओग्राफर मास्टर मयूर हे प्रशिक्षणाच्या शेवटी एक दिवसाचे प्रशिक्षण देणार आहेत.
वणीतील एसबी लॉनमध्ये संध्याकाळी 5 ते 8 या कालावधीत हे प्रशिक्षण सुरू आहे. सध्या 300 पेक्षा अधिक व्यक्तींनी यात सहभाग घेतला आहे. पाच वर्षांच्या चिमुकली पासून 50 वर्षांच्या चिरतरुण महिला या प्रशिक्षणात सहभागी झाल्या आहेत. यात गरबा आणि दांडियाच्या 30 स्टेप शिकवल्या जाणार आहे. यासाठी ग्लॉरिअर डान्स अकाडमीचे 14 प्रशिक्षक परिश्रम घेत आहे. 7 महिला आणि 7 पुरुष ट्रेनर प्रशिक्षण देण्याचं कार्य करीत आहे.
वणीतील ग्लॉरिअस डान्स अकाडमीचे संचालक आशिष नागभीडकर हे इथे प्रमुख मार्गदर्शक आहे. या कार्यशाळेत रास गरबा, ताली गरबा, बॉलीवुड गरबा, दांडिया यामधील विविध स्टाईल शिकवल्या जाणार आहे. तसेच दांडिया क्वीन, वेषभुषा या बाबतही सर्व माहिती देण्यात येणार अशी माहिती त्यांनी दिली.
जेसीआयचे संस्थापक अध्यक्ष सुमीत चोरडीया वणी बहुगुणीशी बोलताना म्हणाले की…
डान्स हा प्रत्येकालाच आवडतो. पारंपरिक गरबा नृत्य आणि दांडिया यांची तरुणी-महिलांना प्रचंड आवड. कितीही व्यस्त असल्या तरी संपूर्ण नवरात्री दांडिया कार्यक्रमांना महिला-तरुणी आवर्जून जातातच. मात्र त्यासोबतच त्यांना प्रशिक्षणाचीही गरज आहे. त्यामुळे जेसीआयतर्फे आम्ही मोफत प्रशिक्षणाचं आयोजन केलं आहे. शेवटच्या दिवशी सुप्रसिद्ध कोरिओग्राफर हैदराबाद येथील मास्टर मयूर हे या प्रशिक्षणाचं प्रमुख आकर्षण असणार आहे.
प्रशिक्षण सुरू होऊन काही कालावधी लोटला असला तरीही ज्या महिलांची प्रशिक्षणात सहभागी होण्याची इच्छा आहे त्यांना या प्रशिक्षणात सहभागी होता येणार आहे. तरी इच्छुक महिलांनी संध्याकाळी एसबी लॉन येथे संपर्क साधावा असे आवाहन जेसीआयतर्फे करण्यात आले आहे.