वणीत बाबा ताजोद्दीन जन्मोत्सवाचे आयोजन
सालाना उर्स शरीफ निमित्त विविध कार्यक्रमांची रेलचेल
विवेक तोटेवार, वणी: संत हजरत सैय्यद बाबा ताजोद्दीन यांचा जन्मोत्सव (उर्स) यावर्षी थाटात साजरा केला जाणार आहे. वणीतील हजरत सैय्यद बाबा ताजोद्दीन दरगा (चिल्ला) येथे चार दिवशीय सालाना उर्स शरीफ याचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दिनांक 4 ऑक्टोबर ते रविवार दिनांक 7 ऑक्टोबरपर्यंत हा उर्स चालणार आहे. यात विविध कार्यक्रमाची रेसचेल असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा व दर्गाह कमिटीने या उर्सचे आयोजन केले आहे.
गुरुवारी दिनांक 4 ऑक्टोबरला दुपारी 1-5 या दरम्यान ‘कुराणखानी’चे आयोजन करण्यात आले आहे. यात प्रेषित मोहम्मद यांना परमेश्वराने दिलेल्या दिव्य संदेशांचे पठण केले जाणार आहे. 5 ऑक्टोबर शुक्रवारी सकाळी 10 वाजता शाही लंगर म्हणजेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 3 ते रात्री 10 च्या दरम्यान सुप्रसिद्ध कव्वाल अनिस नवाब, मुंबई यांचा ‘महफिले कव्वाली’ हा कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. अनिस नवाब यांच्या बाबा ताजोद्दीन यांच्यावरील कव्वाली जगभरात प्रसिद्ध आहेत. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
रविवारी 7 ऑक्टोबरला दुपारी 4 वाजता शाही संदल (शोभायात्रा) याचे आयोजन करण्यात आले आहे. हा शाही संदल घोडे, बँड, कव्वाली यांच्या ठेक्यावर वाजत गाजत वणीतील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करणार आहे.
सालाना उर्स शरीफ याविषयी ‘वणी बहुगुणी’शी बोलताना या उर्सचे संयोजक डॉ. महेंद्र लोढा म्हणाले की…
बाबा ताजोद्दीन हे हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतिक आहे. त्यांच्या भाविकांमध्ये केवळ मुस्लिमच नाही तर हिंदू भाविकांचाही मोठा सहभाग आहे. त्यामुळे या संतांचा जन्मोत्सव थाटात साजरा झाला पाहिजे. हा जन्मोत्सव म्हणजे सामाजिक सलोखा, धार्मिक सलोख्याचा एक भाग आहे. देशहितासाठी असे कार्यक्रम एकत्रीत होणे गरजेचे असल्याने या कार्यक्रमाच्या नियोयनात मी पुढाकार घेतला आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सैय्यद बाबा ताजोद्दीन उर्स कमेटी चे अध्यक्ष जुबेर खान उपाध्यक्ष सैय्यद रविश, सचिव तौसिम खान, शेख शाहिद, तौफिक शेख, मोबिन शेख (पिर साहब) यांच्यासह मार्गदर्शन म्हणून लाभलेले सामाजिक कार्यकर्ते भरत ठाकूर, न. प. कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष इजहार शेख, नगरसेवक निलेश होले, नगरसेविका प्रीती बिडकर तसेच कमेटीचे सदस्य परिश्रम घेत आहे. अधिक माहितीसाठी मोहसिन खान, इम्रान खान, मुबारक शेख यांना संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. या सालाना उर्स शरीफमध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांनी सहभागी होऊन कार्यक्रमाचा ला़भ घ्यावा असे आवाहन संजोयक डॉ. महेंद्र लोढा आणि सैय्यद बाबा ताजोद्दीन र.अ. दर्गाह उर्स कमेटीद्वारे करण्यात आले आहे.