जैताई नवरात्रात 10 ते 18 ऑक्टोबर पर्यंत वैशिष्टयपूर्ण कार्यक्रम
सागर मुने, वणी: येथील जैताई मंदिराच्या दि. 10 ते 18 ऑक्टोबर पर्यंत संपन्न होत असलेल्या नवरात्रात अनेक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्वरगंधर्व सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘स्वर आले जुळूनी ‘ हा त्यांनी गायलेल्या सुमधुर गीतांचा कार्यक्रम नागपूर येथील श्रीब्रह्मचैतन्यस्वरोत्सव संस्था प्रस्तुत करणार आहे. कार्यक्रमाची संकल्पना व निवेदन किशोर गलांडे यांचे आहे. हा कार्यक्रम दि. 15 ऑक्टोबर रोजी आयोजित असून दि. 16 ऑक्टोबर रोजी हीच संस्था राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथीनिमित्त वं. तुकडोजी महाराजांच्या रचनांवर आधारित ‘तुकड्या म्हणे’ हा संगीत कार्यक्रम सादर करणार आहे.
दि. 14 ऑक्टोबर रोजी समाजसेविका अॅड्. पारोमिता गोस्वामी यांना कादंबरीकार शुभांगी भडभडे यांच्या हस्ते “जैताई मातृगौरव” पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्काराचे हे 10 वे वर्ष आहे. दि.12 व 13 ऑक्टोबर रोजी प्रख्यात युवा कीर्तनकार ऋतुपर्ण रामदासी यांची कीर्तने आयोजित आहेत. या शिवाय तीन दिवस स्थानिक कलावंतांना वाव देण्यात आला आहे. हे सर्व कार्यक्रम मंदिराच्या प्रांगणात रोज रात्री 8 वाजता संपन्न होणार आहेत.
मंदिरात रोज सकाळी अन्नदात्यांतर्फे 11 वाजता महाप्रसाद वितरीत होतो व सायं 6.30 वाजता महाआरती होते.
नवरात्रात पहाटे 4 पासून रात्री 12 पर्यंत दर्शनार्थींची गर्दी असते. परिसरातील अनेक गावातून भक्त दर्शनाला येतात.