बहुगुणी डेस्क, वणी: सध्या शेतकऱ्याला विविध संकटांचा सामना करावा लागत असून, पिकांची वन्यप्राण्यांकडून देखील नासाडी होत आहे. त्यामुळे शासनाला जागे करण्यासाठी देशातील पहिली विदर्भस्तरीय शेतकरी परिषद वणी येथे ७ ऑक्टोबरला होत आहे. सकाळी 11 वाजता वसंत जिनिंग हॉलमध्ये या परिषदेला सुरूवात होणार आहे.
शेतकऱ्यांना जागृत करण्यासाठी लढा शेतकरी हक्काचा या संघटनेने वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्याला निर्माण होणाऱ्या समस्या व शासनाने करावयाचे नियोजन या विषयांवर विदर्भस्तरीय शेतकरी परिषद घेण्यात येणार आहे. सदर परिषदेचे उद्घाटन माजी खा. नाना पटोले यांच्या हस्ते होणार आहे.
अध्यक्षस्थानी शेतकरी नेते अभ्यासक चंद्रकांत वानखेडे राहतील. तर आ. बच्चू कडू, प्रकाश पोहरे, माजी आ. वामनराव चटप, सेवानिवृत्त वन अधिकारी डी.एन.राऊत, प्रधान सचिव अनंत कळसे, मानद वन्यजीव तज्ज्ञ डॉ. रमजान विराणी, माजी कुलगुरू शरद निंबाळकर आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आ. संजीवरेड्डी बोदकुरवार, आ. बाळू धानोरकर, माजी आ. वामनराव कासावार, विश्वास नांदेकर, चंद्रपूर जिल्हा परिषदचे अध्यक्ष देवराव भोंगळे, डॉ. सुरेश महाकुलकर, पांढरकवडा नगराध्यक्ष वैशाली नहाते, जिल्हा परिषद सदस्य वीणा मालेकर, राळेगाव बाजार समिती सभापती प्रफुल्ल मानकर, पांढरकवडा बाजार समिती सभापती प्रकाश मानकर उपस्थित राहणार आहे.
या शेतकरी परिषदेला मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन परिषदेचे संस्थापक रुद्रा कुचनकार, अध्यक्ष देवराव धांडे, सचिव सुनील नांदेकर, प्रशांत गोहोकार यांनी केले आहे..