जेसीबीच्या ड्रायव्हरचा करंट लागून मृत्यू
जेसीबी नेत असताना रस्त्यावरील तारांना जेसीबीचा स्पर्श
सागर मुने, वणी: जेसीबी ट्रकवर नेत असताना जेसीबीला इलेक्ट्रीक तारांचा स्पर्ष झाल्याने यात ड्रायव्हरचा मृत्यू झाला. तर क्लिनर जखमी झाला आहे. दुपारी साडेतीनच्या दरम्यानची ही घटना आहे. नांदेपेरा रांगणा इथं ही घटना झाली आहे. जोपर्यंत कंत्राटदार मृतकाला नुकसान भरपाई देत नाही तोपर्यंत प्रेत उचलू देणार नाही अशी भूमिका गावक-यांनी घेतली असल्याने सध्या घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राजनाथ वय अंदाजे 30 हा मुळचा उत्तर प्रदेशातील असून कामानिमित्त तो नांदेपेरा इथ राहतो. सध्या नांदेपेरा रांगणा या रस्त्यावर पूल बांधण्याचे काम सुरू आहे. त्याकामासाठी राजनाथ त्याच्या सहका-यासोबत आज दुपारी ट्रक (mh 09 L 4863) या वाहनात जेसीबी नेत होता. जेसीबीचे तोंड वाहणाच्या वर आले होते. वाटेत इलेक्ट्रीकची तार मध्ये आली. त्यात जेसीबीच्या वरच्या भागाचा स्पर्ष झाला.
ही बाब तिथे असलेल्या सुपरवायजरने त्यांना कळवली. ते बघण्यासाठी राजनाथ ट्रकखाली उतरताच त्याला वीजेचा जोरदार धक्का बसला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा सहकारी जावेद जखमी झाला. जावेद हा मारेगाव येथील रहिवाशी आहे. जावेदची परिस्थिती सध्या धोक्याबाहेर असून त्याच्यावर सुगम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.
मृतक राजनाथ याला लहान मूल असून त्याचा मृत्यूची बातमी समजताच नांदेपेरा परिसरातील नागरिक संतप्त झालेत. त्यांनी कंत्राटदाराने तात्काळ आर्थिक मदत दयावी अशी मागणी केली. तसेच शासनानेही मदत दयावी अन्यथा प्रेत नेवू देणार नाही अशी भूमिका घेतली. त्यामुळे तिथे तणावाचे वातावरण निर्माण झाले. वृत्त लिहेपर्यंत तिथे पोलीस फोर्स पोहोचली होती. तसेच या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल व्हायचा आहे.