विवेक तोटेवार, वणी: शेतात काढून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजीला समाजकंटकाने पेटवून दिल्याने शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले. ही घटना सोमवारी रात्री वागदरा येथे घडली. या प्रकरणी अज्ञात इसमाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मनोज वैद्य (36) हे नवीन वागदरा येथील रहिवाशी आहे. त्यांनी 10 एकरामध्ये सोयाबिन लावला होता. त्यातील 7 एकरातील सोयाबिनची कापणी झाली होती. तर 3 एकरातील सोयाबिनची कापणी बाकी होती. 7 एकरमध्ये सुमारे 60 पोते पीक त्यांना झाले होते.
रात्री साडे दहाच्या सुमारास मनोज घरी असताना त्यांना त्यांच्या शेता शेजारी असलेल्या एका शेतक-या कॉल आला व त्यांच्या शेतात कुणीतरी आग लावल्याचे त्यांना कळवले. मनोज यांनी लगेच शेताकडे धाव घेतली. मात्र शेतात पोहोचेपर्यंत सोयाबिनची संपूर्ण गंजी जळून खाक झाली होती.
यात त्यांचे सुमारे 60 पोते सोयाबिन जळाले असून मजुरांचा खर्च, फवारणी इत्यादी खर्च पकडून सुमारे अडीच ते तीन लाखांचे नुकसान झाले आहे. मंगळवारी तलाठी यांनी येऊन याबाबतचा पंचनामा केला. मात्र अशा घटनेसाठी कोणताही नुकसान भरपाईची तरतूद नसल्याचे त्यांनी कळवल्याने मनोज यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याप्रकरणी त्यांनी वणी पोलीस ठाण्यात तक्रार केली असून अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लिंकवर क्लिक करून पाहा घटनेचा व्हिडीओ…