अन् चिमुकल्यांच्या चेह-यावर फुलले हास्य…
छत्तीसगडी मजुरांच्या दुर्गा उत्सवात भव्य दिव्य कार्यक्रम
विवेक तोटेवार, वणी: बुधवारी हा दिवस छत्तीसगडी मजुर आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी विशेष ठरला. कधी नव्हे ते इथ साजरा केल्या जाणा-या दुर्गा उत्सवात पहिल्यादाच भव्य दिव्य असा कार्यक्रम घेण्यात आला. मुलांसाठी, महिलांसाठी विविध स्पर्धा, बक्षीसं याने संपूर्ण परिसर भारावून गेला. राष्ट्रावादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांनी लालपुलिया परिसरात जाऊन या छत्तीसगडी मजुरांच्या कुटुंबियांसोबत नवरात्र साजरी केली.
वणीतील लालपुलिया परिसर. याची ओळख म्हणजे कोळशाच्या धुळीने माखलेला, परप्रांतिय कामगारांनी भरलेला एक भाग. या भागात कोळसा प्लांट आहे. इथे मोठ्या संख्येने छत्तीसगडी मजूर येऊन काम करून उदरनिर्वाह करतात. त्यांचे कुटुंबही तिथल्याच जागेत छोट्या झोपडीत राहतात. सुमारे हजार लोकांची ही वस्ती आहे. मात्र हा मजूर वर्ग कायमच दुर्लक्षीत राहिला आहे. अत्यंत गरीबीत जरी हा मजुर वर्ग राहत असला तरी सण उत्सव मात्र ते तितक्याच उत्साहात साजरे करतात.
या वर्षी या मजुरांचा नवरात्र उत्सव खास ठरला. डॉ. महेंद्र लोढा आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी त्यांच्या या उत्सवात सामिल झाले. अष्टमीनिमित्त तिथे डॉ. लोढा यांच्या हस्ते देवीची पूजा करण्यात आली. त्यानंतर तिथे मुलांसाठी आणि महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यात मुलांना प्रथम, द्वितीय असा क्रमांक न देता सर्वच सहभागी मुलांना बक्षिसांचं वाटप करण्यात आलं. पहिल्यांदाच असा कार्यक्रम या ठिकाणी झाल्याने मुलांना झालेला आनंद चेह-यावरून ओसंडून वाहत होता.
या वेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयसिंगजी गोहोकर, राजाभाऊ बिलोरिया, प्रभाकर मानकर, संजय जंबे, महेश पिदूरकर, स्वप्निल धुर्वे, सिराज सिद्धिकी, मोहाडे, संदिप धवणे, अंकुश नेहारे, सोनू निमसटकर, राजू उपरकर यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि वस्तीतील लोक उपस्थित होते.