गिरीश कुबडे, वणी: सध्या रोज पेट्रोलचे दर रोज बदलत आहे. त्यामुळे रोज किती पेट्रोलचे दर काय आहे याची माहिती ग्राहकांना नसते. याचाच फायदा काही पेट्रोल पंपचालक घेत असून याद्वारे ग्राहकांची लूट करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
वणी येथील दत्त मंदिर जवळ सिद्धार्थ पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपवर आजचा दर हा 87.11 पैसे आहे. मात्र या पेट्रोलपंपवर दोन दिवसांपूर्वी असलेल्या 88.13 पैसे या दराने पेट्रोलची विक्री सुरू होती. त्यामुळे दर लीटरमागे 1 रुपया 2 पैशाची लूट पंपचालकाकडून होत असल्याचे समोर आले आहे.
पेट्रोल पंपचालक हा ग्राहकांची लूट करत असल्याची माहिती ‘वणी बहुगुणी’ला मिळाली. त्यानुसार वणी बहुगुणीची टीम तिथे गेली असता. एका मशिनमध्ये चालू दराने तर दुस-या मशिनमध्ये जुन्या म्हणजेच चढ्या दराने विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आले.
पेट्रोलवाटपाच्या मशिन या दोन प्रकारच्या असतात. यात एक मशिन ही ऍटोमॅटिक आहे तर दुसरी मशिन ही मॅनुअली असते. ऍटोमॅटिक मशिनमध्ये रोज रात्री 12 वाजता दर अपडेट होतात. तर मॅनुअल मशिनमध्ये हे दर रोज रात्री 12 वाजता अपडेट करावे लागतात. मात्र सदर पेट्रोल पंपावर हे दर दोन दिवसांपासून बदवले गेले नव्हते. त्यामुळे अशी रोजची किती रुपयांची ग्राहकांची लूट होते हे लक्षात येते.
याबाबत पेट्रोल पंपचालकाला जाब विचारला असता त्यांनी मॅनेजर सुट्टीवर असल्याने दर बदलवण्यास वेळ मिळाला नाही असे कारणं देत या गंभीर प्रकारापासून जबाबदारी झटकायचा प्रयत्न केला. मात्र यात ग्राहकांची मोठी आर्थिक लूट झाली हे लक्षात आणून देताच त्यावर त्यांनी मौन बाळगले.
याबाबत वणीचे प्रभारी तहसिलदार यांना ही बाब निदर्शनास आणून दिली असता. त्यांनी आधी तुम्ही तक्रार करा मग आम्ही कार्यवाही करू असे उत्तर दिले. आधीच सर्वसामान्यांचे पेट्रोल दरवाढीमुळे कंबरडे मोडले आहे. त्यातच ग्राहकांच्या लुटीबाबत प्रशासनास एखादी गोष्ट निदर्शनास आणून दिल्यानंतर कार्यवाहीबाबत उदासिन भूमिका घेत असेल तर सर्वसामान्यांनी कुणाकडे दाद मागायची हा प्रश्न उपस्थित होत आहे.
मॅनुअली मशिन असलेले किती पेट्रोल पंप सध्या वणी परिसरात कार्यरत आहेत ? त्याबाबत रोज रात्री बारा वाजता दर बदलले जातात की नाही ? याची तपासणी होणे गरजेचे आहे. अन्यथा ग्राहकांची लूट सुरूच राहिल. प्रशासनाच्या नाकावर टिच्चून ही लूट राजरोसपणे सुरू असताना प्रशासन काय करते हा प्रश्न विचारला जातोय. यात प्रशासनाच्या हाताला ‘पेट्रोल’चा वास तर नाही ना अशी शंका उपस्थित केली जात आहे.
वणीत पेट्रोल पंपचालकाची लबाडी उघडकीस आल्यानंतर आता ग्राहकांनीही सजग राहणे गरजेचे आहे. सदर पेट्रोल पंपचालकावर प्रशासन काय कार्यवाही करते हे पाहणे औचित्याचे ठरेल.