रा. स्व. संघाचा वणीत विजयादशमी उत्सव साजरा

0

बहुगुणी डेस्क, वणी: संघ एक ऊर्जानिर्मिती केंद्र आहे. संघाच्या नियमित शाखेतून ऊर्जा घेऊन तयार झालेले ऊर्जावान स्वयंसेवक विविध क्षेत्रात पाठवून प्रत्येक क्षेत्रात राष्ट्रीय विचारांची प्रवृत्ती वाढवायची आहे. संघाची दैनंदिन शाखा हे चार्जिंग केंद्र आहे. संघ प्रत्यक्ष काहीही करत नाही. पण या देशात तेच घडेल जे संघाच्या मनात आहे. असे प्रतिपादन विचारवंत, संत साहित्याचे अभ्यासक विवेक घळसासी यांनी केले. ते वणी शाखेच्या विजयादशमी उत्सवात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

वणी शाखेचा विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सव येथील एस. पी. एम. विद्यालयाच्या मैदानावर दि. 27 ऑक्टोबरला पार पडला. या प्रसंगी प्रा. दिलीप मालेकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर तालुका संघचालक हरिहर भागवत प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रमुख वक्ते म्हणून बोलतांना घळसासी पुढे म्हणाले की, 1925 पासून विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजासमोर एक शक्ती विकसित होत आहे. तो म्हणजे संघ होय. एक माणूस म्हणून जागृत होऊन देशाला जागृत करायचे, स्वतःला जाग करण्याची विज्ञाननिष्ठ प्रणाली म्हणजे संघ होय. संघाला पूर्ण भारतीय समाज जागे करायचे आहे. आपण जागे झालो तर जगाच कल्याण होईल, नाहीतर विश्वाचा विनाश अटळ आहे. मातृभूमीच्या चरण कमलावर तन, मन अर्पित करून भारत मातेचं परम वैभव संघाला पुन्हा प्राप्त करायचे आहे.

कामगार क्षेत्रात भारतीय मजदूर संघ, शिक्षण क्षेत्रात विद्याभारती, विद्यार्थी क्षेत्रात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कला क्षेत्रात संस्कार भारती, आदिवासी दुर्गम क्षेत्रात वनवासी कल्याण आश्रम, उद्योग क्षेत्रात उद्योग भारती अशा प्रत्येक क्षेत्रात संघ विचाराने काम सुरू आहे. राष्ट्रविरोधी विचारांचे विषाणू आपल्यापर्यंत पोहचविण्याचे काम विविध मार्गाने सुरू आहे. मानवतेच्या नावाखाली भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे . त्यापासून आपल्याला सावध असणे ही काळाची गरज आहे. असे प्रतिपादन त्यांनी केले.

अध्यक्षस्थानावरून बोलतांना प्रा. मालेकर म्हणाले की, आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांची धडाडी व दूरदृष्टी व्यापक होती. या उत्सवात प्रास्ताविक जिल्हा सहकार्यवाह प्रशांत भालेराव यांनी केले. सुभाषित सचिन जोशी, अमृतवचन हर्षद गहुकर, वैयक्तिक गीत प्रतिक पेटकर यांनी सादर केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.