वर्धा नदीवरील पाणी पुरवठा योजनेच्या कामाची दुरुस्ती सुरू
सोमवारी वणीत पोहोचणार पाणी, वणीकरांना मिळणार दिलासा
विलास ताजने, वणी: वणी शहराची पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी वणीचे नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्या पुढाकारातून १५ कोटी रुपयांची योजना मंजूर झाली. रांगणा भुरकी गावच्या वर्धा नदीकिनाऱ्यावरून योजनेच्या कामाला गतवर्षी सुरुवात झाली. ११ किलोमीटर अंतरावर असलेल्या ठिकाणावरून वणी पर्यंत पाईपलाईन टाकण्यात आली. मात्र पावसाळा सुरु झाल्याने गतवर्षी काम थांबले.
यावर्षी पाणी टंचाईची शक्यता लक्षात घेता सदर कामाच्या दुरुस्तीला जीवन प्राधिकरण विभागाच्या कंत्राटदारानी नुकतीच सुरुवात केली. पाईपलाईनची डागडुजी करून चाचणी घेण्यात आली. मात्र वणी शहरातील शिवाजी महाराज चौक परिसरापर्यन्त पाणी पोहोचले. परंतु पुढील भूभाग उंच असल्याने किंवा अन्य कारणाने पाणी पुढे वाहून न जाता ठप्प झाले.
परिणामी पाईपलाईनवर दाब निर्माण होऊन काही ठिकाणी पाईप निखळले. कंत्राटदारामार्फत पाईपलाईन निखळण्याचे कारण शोधण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे वणी शहराची पाणी टंचाईची समस्या सुटण्याची आशा निर्माण झाली आहे.
वर्धा नदीवरील पाणी पुरवठा योजनेच्या कामाची दुरुस्ती सुरू
वणी ;
प्रतीक्षा संपली आता जल्लोष करण्याची वेळ जवळ आली: तारेंद्र बोर्डे
वणी बहुगुणीशी बोलताना नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे म्हणाले की पाणी प्रश्न सोडवण्याला आमचा अग्रक्रम आहे. त्यामुळे या ठिकाणी जातीने हजर राहून माझ्या देखरेखीत काम सुरू आहे. ट्रायल संदर्भात थोडेबहोत अडथळे आले होते. मात्र ते दूर करण्यात आले. सोमवारी संध्याकाळी वणीत वर्धा नदीचे पाणी पोहोचणार असून लवकरच दोन तीन आणखी ट्रायल घेण्यात येणार आहे. या सर्व ट्रायलनंतर वणीकरांचा पाणी प्रश्न कायम स्वरूपी सुटणार आहे.