फक्त दोन वेळा खा, लठ्ठपणा दूर पळवा: डॉ. जगन्नाथ दीक्षित
विवेक तोटेवार, वणी: हवं ते खा. पण फक्त दोन वेळेस खा. दिवसातून दोन वेळा खाणे यासोबतच पायी फिरण्याकडे लक्ष दिले तर स्थुलता आणि मधूमेह यांना सहज दूर ठेवता येतं असा सल्ला प्रसिद्ध डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी वणीकरांना दिला. वणीतील शेतकरी लॉन इथे शनिवारी संध्याकाळी झालेल्या व्य़ाख्यानात ते बोलत होते. डॉक्टर असोसिएशनतर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
डॉ. दीक्षित पुढे म्हणाले की वाढलेली चरबी हे अनेक आजारांचं कारण आहे. तुम्ही काहीही खाल्ले तरी शरीरात इन्सुलिन निर्माण होते. वजन आणि मधुमेहाला प्रतिबंध करायचा असेल, तर खूप भूक लागण्याच्या दोन वेळा ओळखा, भोजनाची वेळ निश्चित करा आणि त्याच वेळेत भोजन करा, तसेच ५५ मिनिटांमध्ये भोजन संपवा, असे सांगत त्यांनी दोन भोजनाच्या मधात काही खाऊ नका. ही पद्धत वापरल्याने आज हजारों लोकांना याचा फायदा झाला आहे. असेही ते म्हणाले. सोबतच भोजनात गोड कमी खा, भोजनात प्रोटिन्स वाढविण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
शनिवारी शेतकरी लॉन इथे डॉक्टर असोसिएशनद्वारा डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे ‘विनासायास वेटलॉस आणि मधूमेह’ या विषयावर व्य़ाख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सुमारे 4 हजार लोक सहभागी झाले होते. वणी, मारेगाव, झरी या तालुक्यातून मोठ्या संख्येने लोक डॉ. दीक्षितांचे व्याख्यान ऐकण्यासाठी आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. शिरीष ठाकरे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार होते. यांच्यासह वणी वेकोलि नॉर्थ एरियाचे मुख्य प्रबंधक आरबी सिंह, निमाचे अध्यक्ष डॉ. सपाट, डॉक्टर असोसिएशनचे डॉ. महेंद्र लोढा, कार्यक्रमाचे संयोजक डॉ. महाकुलकर, होमिओपॅथिक असोसिएनचे डॉ. एकरे, डेंटल असोसिएशनचे डॉ. राठोड हे प्रमुख अतिथी होते.
कोल्ड्रिंक्स, बर्गर, पिझ्झा हे देखील लठ्ठपणाला कारणीभूत आहेत. त्यासोबतच वय, लिंग, आनुवंशिक घटक, सामाजिक-आर्थिक परिस्थिती, मेहनतीचा अभाव, भोजन बनविण्याची पद्धती, शिक्षण, हार्मोन्स, मद्यपान, धूम्रपान, वंश आदी वजन वाढण्याची कारणे आहेत. अनेकांना वजन कमी करायचे असते; परंतु कामाच्या व्यापामुळे ते शक्य होत नाही. त्यासाठीच विनासायास वेटलॉस करण्याची पद्धत संशोधित करून आम्ही त्याचा प्रसार करण्याचा प्रयत्न करतोय. असेही ते म्हणाले.
या वेळी डॉक्टर असोसिएशनतर्फे वणी मारेगाव झरी तालुक्यातील ग्रामीण भागात कित्येक वर्षांपासून व्यवसाय म्हणून नाही तर एक सेवा म्हणून प्रॅक्टिस करणारे डॉ. अशोक नालमवार, डॉ. डीएन आवारी, डॉ. अरुण गादेवार, डॉ. मोहन देशपांडे यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच परिसरातील सर्व डॉक्टरांतर्फे डॉ. दीक्षित यांचाही मानपत्र देऊन सन्मान कऱण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. महेंद्र लोढा यांनी केले तर सूत्रसंचलन डॉ. सचिन दुमोरे यांनी केले. डॉ. शिरीष कुमरवार यांनी डॉ. दीक्षितांना दिलेल्या मानपत्राचे वाचन केले तर परिसरातील डॉक्टारांना दिलेल्या मानपत्राचे डॉ. भालचंद्र आवारी यांनी वाचन केले. तर आभार प्रदर्शन डॉ. सुनील जुमनाके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. वडोदेकर, डॉ. मत्ते, डॉ. एकरे, डॉ. विकास हेडाऊ, डॉ. पारशिवे, डॉ. कुमरवार, डॉ. निमजे, डॉ. जुनगरी, डॉ. राहुल खाडे, डॉ. गोफणे, डॉ. डाखोरे, डॉ. झाडे यांच्यासह असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
लिंकवर क्लिक करून पाहा डॉ दीक्षित यांचे संपूर्ण व्याख्यान…