कृषी विभागाची ‘अशी ही बनवाबनवी’
वणी : वणी तालुक्यातील मेंढोली येथील अनेक शेतकऱ्यांना नुकत्याच मृदा आरोग्य पत्रिका मिळाल्या. सदर मृदा आरोग्य पत्रिका पाहताच शेतकऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण परीक्षणासाठी शेतातील मातीचे नमुने न घेता ऍग्रीकल्चरल टेस्टिंग लॅबोरेटरी यवतमाळ यांच्याकडून आरोग्य पत्रिका मिळाल्या आहे. सदर पत्रिकेत मृदा संकलन तारीख ६ ऑगस्ट २०१८ असल्याची नोंद आहे. मात्र सदर काळात परीक्षणासाठी मातीचे नमुने कृषी विभागाने संकलित केलेच नसल्याचे दिवाकर पंधरे, सूर्यभान कुचनकर, भालचंद्र वासेकर आदी शेतकऱ्यांनी वणीबहुगुणीच्या प्रतिनिधींना बोलताना सांगितले.
परिणामी कृषी विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दिवसेंदिवस अधिक उत्पन्न घेण्याच्या उद्देशाने शेतीत रासायनिक खतांसह पाण्याचा अनिर्बंध वापर होत आहे. परिणामी जमिनीचे आरोग्य बिघडत आहे. उत्पादनात घट होत आहे. त्यामुळे मृदेचे आरोग्य चांगले राखण्याच्या अनुषंगाने केंद्र व राज्य शासनाच्या सहयोगाने राष्ट्रीय शेती अभियानाअंतर्गत मृदा आरोग्य पत्रिका योजना सन २०१५-१६ पासून राज्यात राबविल्या जात आहे. माती परीक्षण ही शेतजमिनितील अंगभूत रसायने वा जैवकांचे विश्लेषण होय. याद्वारे शेतात घेण्यात येणारे पीक निश्चित करता येते. व कमी खर्चात उत्पादन घेता येते. तसेच जमिनीच्या कसाची कल्पना येते.
या योजनेच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिका तपासणी करून द्यावयाची आहे. या पत्रिकेच्या द्वारे शेतकऱ्यांना जमिनीची रासायनिक गुणधर्म स्थिती, अन्नद्रव्यांची पातळी आणि कमतरता माहित होते. त्यानुसार विविध पिकांसाठी मिश्र व संयुक्त खतांची मात्रा ठरवता येते. मात्र अशा प्रकारे शेतकऱ्यांची कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून फसवणूक केली जात आहे. त्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करीत आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांची अशी बनवाबनवी करणे म्हणजे शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.